मुंबई - २०१९ मध्ये भाजपसोबत राष्ट्रवादीने सरकार स्थापन करण्याबाबत शरद पवार यांच्याशी आमची चर्चा झाली. त्यानुसारच मी व अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपद घेण्याचे ठरले, पण पहाटेच्या शपथविधीच्या तीन-चार दिवस आधी शरद पवार मागे फिरले व त्यांनी दुटप्पी भूमिका घेतली, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करायचे ठरवले. आम्ही पर्यायाचा विचार करत असताना राष्ट्रवादीचे काही लोक म्हणाले की, आपण मिळून स्थिर सरकार देऊ शकतो. त्यानुसार शरद पवार यांच्याशी आमची बैठक झाली. सरकार स्थापन करायचे, ते कसे चालविले जाईल वगैरे सगळे ठरले. तसा करारदेखील झाला. पवारांनी या सरकारसाठी आशीर्वादही दिले. पण एका क्षणी अचानक शरद पवार मागे हटले.
शरद पवार मागे फिरले तरी अजित पवार यांच्याकडे पर्याय उरला नव्हता. त्यांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न होता, शरद पवार यांनीच पुढाकार घेतला आहे तर ते आणि सोबतचे सगळेच लोक या सरकारसोबत येतील असे वाटले होते, पण तसे झाले नाही. शरद पवार दुटप्पी वागले, आमची दिशाभूल करून त्यांनी डाव खेळला. -देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
अर्धेच सत्य बाहेर....मला अतिशय आनंद आहे की, पवार साहेबांना सत्य सांगावे लागले. त्यांच्या गुगलीमुळे मी बोल्ड होण्याऐवजी त्याचे पुतणेच बोल्ड झाले. अर्धेच सत्य बाहेर आले. पूर्ण सत्य लवकरच बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया नंतर फडणवीस यांनी दिली.
सत्तेसाठी काहीही करायला फडणवीस तयार असतात२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर माझी भेट घेऊन चर्चा केल्याचे आणि दोन दिवसांनी मी भूमिका बदलल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणत असतील तर, दोन दिवसांनी त्यांनी चोरून शपथ का घेतली, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला.
सत्तेसाठी फडणवीस काहीही करायला तयार असतात आणि त्यांचे हे वास्तव समाजासमोर यावे, यासाठीच नंतरची खेळी खेळली. पहाटेच्या शपथविधीनंतर विकेट कुणाची गेली, हे सर्वश्रुत आहे. फडणवीस यांनी राजकीय वक्तव्ये करण्याऐवजी राज्यातील कायदा- सुव्यवस्थेकडे गांभीर्याने बघावे. - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी
फडणवीस अज्ञानी१९७८ च्या पुलोदच्या प्रयोगावेळी आम्ही एस. काँग्रेस म्हणून काँग्रेसच्या विरोधात लढलो होतो. त्यानंतरची समीकरणे वेगळी होती. सत्तेसाठी आम्ही एकत्रित आलो होतो. फडणवीस लहान असल्याने त्यांचे अज्ञान स्पष्ट होत आहे, असा टोला पवारांनी लगावला.
पवार म्हणाले, 'मी क्रिकेट खेळत नसलो, तरी माझे सासरे सदू शिंदे हे भारतीय क्रिकेट संघात गुगली बॉलर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्याकडून मी क्रिकेटमध्ये नाही, मात्र राजकारणात गुगली कशी टाकावी व विकेट कशी काढावी, हे मात्र शिकलो. पहाटेच्या शपथविधीनंतर विकेट कुणाची गेली, हे सर्वश्रुत आहे.' पहाटेच्या शपथविधीनंतर महाविकास आघाडीचा झालेला शपथविधी हा पवारांच्या राजकीय खेळीचा डाव होता का, असे विचारल्यावर "हा डाव वगैरे होता किंवा नाही हे तुम्हीच ठरवा. मात्र, त्यात कोण फसले, हे सर्वांनी पाहिले आहे, " असे ते म्हणाले.