राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) दुसऱ्या दिवशी सभागृहात जात असताना आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे विधानसभेच्या पायऱ्यावर इतर भाजप सदस्यांसमेवत बसले होते. त्यावेळी, नेमकं आदित्य ठाकरे पायरी चढून वर जात असताना, नितेश राणेंनी त्यांच्याकडे पाहून म्याव, म्याव... असा आवाज काढला. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाचे पडसादही विधीमंडळात उमटल्याचं दिसून आलं. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांना भुजबळांबाबतची एक आठवण करुन दिली.
शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी नितेश राणेंच्या कृत्यावर आक्षेप घेत त्यांच्या निलंबनाची मागणी केली. दरम्यान, यावेळी फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत नितेश राणे यांच्या कृतीचं आपण समर्थन करत नसल्याचं म्हटलं. तसंच यावेळी त्यांनी भास्कर जाधव यांना छगन भुजबळ यांचा अपमान केल्याची आठवण करुन दिली.
"याच सभागृहात जेव्हा भास्कर जाधव या ठिकाणी असायचे आणि भुजबळ समोर यायचे तेव्हा भुजबळांना हुप हुप करुन चिडवणाऱ्यांमध्ये भास्कर जाधवही होते, हे या सभागृहानं पाहिलं आहे. आम्ही त्याचंही समर्थन नाही," असं त्यांनी नमूद केलं.
काय म्हणाले जाधव?आदित्य ठाकरे यांच्याबाबत विधीमंडळाच्या पायऱ्यावर बसून विरोधकांनी काही आवाज काढले. आमदार सुनील प्रभू यांनी हा विषय मांडल्यानंतर विरोधी पक्ष नेत्यांनी चांगल्या प्रकारे सल्ला दिला. अशा प्रकारचं वर्तन करू नये असं त्यांच्या पक्षातील नेतेदेखील म्हणाले होते. परंतु नितेश राणे हे त्याना जुमानत नाहीत. बाहेर जाऊन ते बोलतच होते. अशा सदस्याचं निलंबन करावं अशी माझी मागणी असल्याचं जाधव म्हणाले होते.