लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील पराभवाला कारणीभूत ठरल्याची टीका झेलणारे अजित पवार महायुतीपासून फारकत घेणार असल्याच्या चर्चांना उत आला आहे. काल राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपाने मविआ सरकार असताना दाऊदशी संबंध असल्यावरून प्रचंड विरोध केलेला त्या नवाब मलिकांनी देखील हजेरी लावली. यावरून आता महायुतीत आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असून विरोधकांनीही यावरून शरसंधान साधण्यास सुरुवात केली आहे.
देवगिरी बंगल्यावर अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह इतर नेते हजर होते. या बैठकीला पक्षाच्या आमदारांनाही बोलविण्यात आले होते. गेल्या विधानसभा अधिवेशनावेळी मलिक यांना आजारपणामुळे उपचारासाठी जामिन मिळाला होता. तेव्हा मलिक अधिवेशनात आले होते, परंतू त्यांना महायुतीपासून वेगळे बसविण्यात आले होते. परंतू, आता थेट राष्ट्रवादीच्या बैठकीतच मलिक दिसल्याने अजित पवारांनी भाजपावर कुरघोडी केल्याचे बोलले जात आहे.
भाजपकडून मलिक यांच्या महायुतीतील प्रवेशाला जाहीरपणे विरोध करण्यात आलेला असताना अजित पवारांनी मलिक यांना बैठकीस बोलावल्याने महायुतीत पुन्हा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नवाब मलिक सोबत आहेत की नाही याचा खुलासा फडणवीसांनी करावा, अशी मागणी केली आहे.
महायुतीमध्ये सारे काही अलबेल चालू आहे असे मला दिसत नाही. त्यांच्यामध्ये प्रचंड कुरघोड्या सुरु आहेत. एकीकडे अर्थमंत्री बजेट मांडतो आणि दुसरीकडे मुख्यमंत्री स्वतः घोषणा करतात. हे कुरघोडीचे राजकारण तिघांमध्ये प्रचंड वाढले आहे. नवाब मालिकांच्या मतांची गरज आहे म्हणून कदाचित त्यांना बोलावले असणार, ते सोबत आहेत की नाहीत याचा खुलासा आता फडवीसांनीच करावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. नवाब मलिकांच्या उपस्थितीबाबत अजित पवारांना विचारले असता त्यांनी काही त्रास होतोय का, असा सवाल पत्रकारांना केला आहे.