Devendra Fadnavis vs Sharad Pawar: "लज्जास्पद!!! देवेंद्र फडणवीसांनी 'ती' पातळी गाठली", पवारांबद्दलच्या वक्तव्यावरून NCP ने घेतला खरपूस समाचार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 12:00 PM2023-02-14T12:00:33+5:302023-02-14T12:01:14+5:30
पहाटेच्या शपथविधीची शरद पवारांना कल्पना होती, असे फडणवीस म्हणाले होते
Devendra Fadnavis vs Sharad Pawar: २०१९च्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर महाविकास आघाडीची जुळवाजुळव सुरू असताना अचानक पहाटेच्या शपथविधीने साऱ्यांना आश्चर्यचकित केले. भाजपाचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी अचानक सरकार स्थापन केले. हे सरकार दीड दिवस चालले. या घटनेनंतर सुमारे ३ वर्षानंतर देवेंद्र फडणवीसांनी गौप्यस्फोट केला. '२०१९ मध्ये आम्ही घेतलेल्या शपथविधी संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना माहिती होती', असे ते म्हणाले. या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी हे विधान रुचले नाही. त्याशिवाय, राष्ट्रवादीचे नेतेमंडळीही आता फडणवीसांवर खवळल्याचे दिसत आहे.
'२०१९ मध्ये आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली होती. या सरकार संदर्भात सर्व चर्चा झाल्या होत्या. पण, ऐनवेळेला आमच्यासोबत विश्वासघात करण्यात झाला. पहिला विश्वासघात उद्धव ठाकरे यांनी केला आणि दुसरा विश्वासघात पवारांनी केला,' असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यावर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ता क्लाईड क्रास्टो यांनी फडणवीसांचा खरपूस समाचार घेतला. "देवेंद्र फडणवीस हे अजिंक्य आहेत असा भाजपचा दावा आहे, पण हा दावा पोकळ आहे. सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी माननीय शरद पवार साहेबांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या गोपीचंद पडळकरांसारख्या लोकांची पातळी त्यांनी गाठली आहे. लज्जास्पद!!!" असे ट्विट करत त्यांनी फडणवीसांवर टीका केली.
देवेंद्र फडणवीस हे अजिंक्य आहेत असा भाजपचा दावा आहे, पण हा दावा पोकळ आहे.
— Clyde Crasto - क्लाईड क्रास्टो (@Clyde_Crasto) February 14, 2023
सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी माननीय शरद पवार साहेबांच्या नावाचा गैरवापर करणार्या गोपीचंद पडळकरांसारख्या लोकांची पातळी त्यांनी गाठली आहे.
लज्जास्पद!!!@BJP4Maharashtra
शरद पवार फडणवीसांच्या विधानावर काय म्हणाले?
“देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत आणि सभ्य व्यक्ती आहेत. असत्याचा आधार घेऊन ते अशा प्रकारची विधानं करतील असं वाटलं नव्हतं,” अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
दोन वेळा विश्वासघात- फडणवीसांनी व्यक्त केली खंत
“माझ्यासोबत दोनवेळा विश्वासघात झाला. पहिला उद्धव ठाकरेंनी केला. त्यांनी आमच्यासोबत निवडणुका लढल्या आणि निवडून आले. प्रचार सभेत पंतप्रधान मोदी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे म्हणत होते तेव्हा उद्धव ठाकरे टाळ्या वाजवत होते. पण ज्यावेळी नंबर लक्षात आला की आपल्याला मुख्यमंत्री होता येईल. त्यावेळी त्यांनी माझा फोनही घेतला नाही. माझ्याशी चर्चाही केली नाही. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची त्यांना इतकी प्रिय झाली की ते राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत निघून गेले. त्यामुळे एकप्रकारे विश्वासघात त्यांनी केला आहे", असे फडणवीस म्हणाले.