मुंबई: मनसे भाजपची 'सी' टीम असल्याची टीका पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(aaditya thackeray) यांनी केली होती. त्या टीकेला आता विरोधी पक्षनेते नेते देवेंद्र फडणवीस(devendra fadnavis) यांनी प्रत्तुत्तर दिले आहे. 'शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीची कितवी टीम आहे?' असा सवाल फडणवीसांनी केला आहे. तसेच, 'एक मुख्यमंत्रीपद घेऊन तुम्ही पक्षाची काय अवस्था केली. आपलं ठेवायचा झाकून आणि दुसऱ्याच बघायच वाकून', असा टोलाही फडणवीसांनी सेनेला लगावला.
'आता काय घाबरणार..?'आज मुंबईतील दादरच्या वसंत स्मृती कार्यालयातील सभागृहात भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मीडियाशी बोलताना फडणवीस म्हणाले की, 'भारतीय जनता पक्ष लोकांची सेवा करत विस्तारत जाणारा पक्ष आहे. पक्षाची निर्मिती राष्ट्रवादातून झाली आहे. भाजप संघर्ष करत जगातील सर्वात मोठा पक्ष बनला, यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे. अनेकवेळा पक्ष संपवण्याचा प्रयत्न झाला, पण विचार संपला नाही. पक्षाकडे दोन जागा असताना घाबरलो नाही, आतातर 302 जागा आहेत', असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
'महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त करणार'फडणवीस पुढे म्हणाले की, 'राज्यातील सध्याची परिस्थिती भयानक आहे, सरकारच्या विरोधात बोलल्यास जेलमध्ये डांबले जाते. महाराष्ट्राला भ्रष्टाचारापासून मुक्त करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. मुंबईतील परिस्थिती विदारक असून मुंबई महापालिकेने कोविड काळात प्रत्येक कामात भ्रष्टाचार केला. खऱ्या अर्थाने प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणे काय ते महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी दाखवून दिले आहे. अधिवेशनात मुंबई महापालिकेतील घोटाळे उघड केले. मात्र, राज्याच्या मुख्यमंत्र्यानी त्यावर चकार शब्द उच्चारला नाही.'