शुक्रवारी पार पडलेल्या दसरा मेळाव्यादरम्यान (Dasara Melava 2021) उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला होता. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आणि शिवसैनिकच मुख्यमंत्री बनेल याचा पुनरूच्चार केला. यावरून विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेचे बाण सोडले. "दोन वर्ष झाली किती वेळा म्हणणार मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हंत, आता मुखवटा काढा आणि तुमची महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्री बनण्याची होती हे मान्य करा," असं म्हणत त्यांनी टोला लगावला.
"सरकार पाडून दाखवा हे रोज म्हणतात. ज्या दिवशी पडेल ते कळणारही नाही. आम्हाला सध्या त्यात रसही नाही. कामं करून दाखवा, शेतकऱ्यांची मदत करा, तुमच्या हाती सत्ता आहे तुम्ही मदत करून दाखवा," असं फडणवीस यावेळी म्हणाले. "काल मुख्यमंत्री जे बोलले त्यावरून फ्रस्ट्रेशन दिसून येतं. जनतेनं भाजपला नाकारलं नाही. काँग्रेस शिवसेनेला नाकारलं आहे आणि शिवसेनेला पासिंग मार्क्स दिले. जनतेसोबत बेईमानी करत हे सरकार स्थापन केलं आहे," असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
किती वेळा म्हणणार...
"दोन वर्ष झाली किती वेळा म्हणणार मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हंत, आता मुखवटा काढा आणि तुमची महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्री होण्याची होती हे मान्य करा. राजकारणात महत्त्वाकांक्षा चुकीची नाही. परंतु त्याच्या मागे खोटं सांगणं हे चुकीचं आहे. जर तुम्हाला मुख्यमंत्री बनायचं नव्हतं आणि तुम्हाला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं होतं तर तुमच्याकडे रावते. देसाई यांच्यासारखे नेते होते, त्यांना मुख्यमंत्री का केलं नाही?," असा सवालही त्यांनी यावेळी केला.
जर मुख्यमंत्री बनायचं नव्हतं तर राणेंना का पक्षाच्या बाहेर जांवं लागलं. राज ठाकरेंना बाहेर का जावं लागलं. त्यांना पक्षावर कब्जा करायचा नव्हता. या सर्व गोष्टी बोलणं बंद केलं पाहिजे, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.