केंद्र सरकारने देशात क्रूर पद्धतीने लॉकडाऊन लागू केले. त्यामुळे साथीचा फैलाव तर रोखला गेला नाहीच शिवाय अर्थव्यवस्थेचेही प्रचंड नुकसान झाले अशी टीका उद्योगपती राजीव बजाज यांनी केली होती. देशातील कोरोनाच्या स्थितीबाबत राजीव बजाज यांची काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुलाखत घेतली. त्यावेळी बजाज यांनी हे मत व्यक्त केलं होतं. बजाज यांच्या वक्तव्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे.
बजाज हे कोविड किंवा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ नाहीत असं म्हणत फडणवीस यांनी टोला लगावला आहे. तसेच ते उद्योगपती आहेत. दुचाकी गाड्यांबाबत ते बोलले असते तर तो त्यांचा अधिकार ठरला असता असं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना राजीव बजाज यांच्या वक्तव्यावरून एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर 'त्यांना वाटतं हा कठोर लॉकडाऊन होता मला नाही वाटत कठोर होता. एखादा तज्ज्ञ हे बोलला असता तर वेगळी गोष्ट आहे. ते तज्ज्ञ नाहीत' असं उत्तर दिलं आहे.
"बजाज कुटुंब हे वाहन निर्मिती क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. ते आरोग्य क्षेत्रातील किंवा कोविडचे तज्ज्ञ नाहीत. त्यामुळे कोविडसंदर्भात काय केलं पाहिजे हे त्यांचं मत अंतिम सत्य असू शकत नाही. ते स्कूटर कशी बनवायला हवी होती, रिक्षा कशी बनवायला हवी होती किंवा कार कशी बनवायची यासंदर्भात बोलले असते तर ते सत्य असू शकतं. मात्र कोविडदरम्यान काय केलं पाहिजे याबद्दल तुमचं किंवा माझं मत असू शकतं तसेच राजीव बजाज यांचं एक मत असू शकतं" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
राजीव बजाज यांनी 'पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करीत केंद्र सरकारने अत्यंत क्रूर पद्धतीने लॉकडाऊन लागू केले. त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहेत. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या स्थितीमध्ये आर्थिकदृष्ट्या सबळ वर्गातील काही प्रमाणात तग धरू शकतात. मात्र, ज्यांचे पोट हातावर आहे असे मजूर, गरीब वर्गातील लोक, शेतकरी यांच्यासाठी हा अतिशय कठीण काळ आहे. या वर्गातील लोकांना सध्या अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागत आहे. ही वस्तुस्थिती डोळ्याला दिसत असूनही केंद्र सरकार त्यापासून काही धडा शिकायला तयार नाही' असं म्हटलं होतं. उद्योगपती राजीव बजाज व राहुल गांधी यांच्यामध्ये झालेल्या चर्चेमुळे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. गेल्या सहा वर्षांत मोदी सरकारवर इतक्या परखडपणे देशातील कोणत्याही उद्योगपतीने जाहीर टीका केली नव्हती. लॉकडाऊन व केंद्र सरकारच्या धोरणांबाबत राजीव बजाज यांनी आपली मते या मुलाखतीत मांडली.
महत्त्वाच्या बातम्या
30 जून आधी पूर्ण करा 'ही' 7 महत्त्वाची कामं, नाहीतर होईल मोठं नुकसान
CoronaVirus News : ...म्हणून कोरोना पॉझिटिव्ह महिलेने बाळाचं नाव ठेवलं 'सॅनिटायझर'
CoronaVirus News : शिक्षणासाठी काय पण! 'या' मुलीच्या जिद्दीला तुम्हीही कराल सलाम
CoronaVirus News : मंदिरात सॅनिटायझरच्या वापराला पुजाऱ्यांचा विरोध; 'हे' आहे कारण