मुंबई-
राज्यातील गुन्हेगारी, बेरोजगारी, कोरोना काळातील भ्रष्टाचार आणि पोलीस दलातील बदल्यांचं रॅकेट अशा विविध मुद्द्यांवरुन विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील आजच्या भाषणात सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. महाराष्ट्र राज्य आज गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये देशात तिसऱ्या क्रमांकावर असल्याची आकडेवारी सादर करत फडणवीसांनी राज्याचं गृहखातं झोपा काढत असल्याचा आरोप केला. गुन्ह्यांचं प्रमाण अधिक असलं तरी दोषसिद्ध करण्याचं प्रमाण देखील कमी असल्याचा मुद्द्यावर फडणवीसांना यावेळी लक्ष वेधलं. महाराष्ट्रात दोषसिद्ध होण्याचं प्रमाण बिहारपेक्षाही कमी असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.
ठाकरे सरकारवर चौफेर हल्लाबोल करत असताना फडणवीसांनी आपल्या भाषणात निधी वाटपावरही भाष्य केलं. यात ठाकरे सरकारमध्ये अजित पवार सर्वात फायद्यात असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य उमटल्याचं पाहायला मिळालं.
नेमकं काय घडलं?फडणवीस आपलं म्हणणं मांडत असताना त्यांनी निधी वाटपावरुन शिवसेनेला खोचक टोला लगावताना राष्ट्रवादीला कसा सर्वाधिक निधी मिळाला याची आकडेवारी मांडली. "सरकारमध्ये अजितदादा तुम्ही सर्वात फायद्यात आहात असं माझ्या लक्षात आलं आहे. कारण जो निधी वाटप झाला त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अखत्यारितील खात्यांना सर्वाधिक निधी मिळाला. हा आकडा २ लाख ५० हजार ३८८ कोटी इतका आहे. काँग्रेसवाले पण हुशार निघाले. रोज तक्रार करुन करुन त्यांनी १ लाख १ हाजर ७६६ कोटी रुपये निधी प्राप्त केला. पण शिवसेनेवाले हातवर करुन फसले. सर्वात जास्त आमदार असूनही केवळ ५४ हजार ३४३ कोटी निधी मिळाला", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अमरावती, नांदेडमध्ये दंगलीचा 'प्रयोग' अमरावती आणि नांदेडमध्ये झालेल्या दंगली हा राज्यात दंगल घडवली जाऊ शकते यासाठीचा प्रयोग होता, असा खळबळजनक दावा यावेळी फडणवीसांनी केला. एका रात्रीत चाळीस-चाळीस हजाराचा जमाव रस्त्यावर येतोच कसा? या मोर्चाच्या माध्यमातून दंगल घडवली जाऊ शकते असा प्रयोग राज्यात केला गेला आहे. यात जाणीवपूर्वक हिंदूंच्या दुकांना लक्ष्य केलं गेले. हिंदुच्याच दुकानांची तोडफोड केली गेली, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. ज्यादिवशी अमरावतीत संबंधित प्रकार घडला त्यादिवशीच्या घटनेबाबत कुणी बोलायला मागत नाही. पण दुसऱ्या दिवशी त्याचे परिणाम उमटले त्यावरच सगळे बोलू लागले आणि त्यांच्यावरच कारवाई केली जात आहे हे अतिशय दुर्दैवी असल्याचं फडणवीस म्हणाले.