Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : पुण्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केलीय. मुंबईत बोलताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर पुण्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. ढेकणं चिरडायची असतात, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधला होता. दोन दिवसांपूर्वी केलेल्या टीकेवर फडणवीसांनी भाष्य केलं नव्हतं. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं.
शिवसंकल्प मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. मी ढेकणाला आव्हान देत नाही. ढेकणाला बोटानं चिरडलं जातं, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर बोचरी टीका केली होती. यासह गृहमंत्री अमित शाह हे अहमद शाह अब्दालीचे राजकीय वशंज असल्याचेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात बोलताना उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
"उद्धव ठाकरेंचा डोक्यावरचा ताबा सुटला आहे. ते अत्यंत निराश आहेत. त्या निराशेमध्ये ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहेत त्यावरुन मला असं वाटतं की याच्यावर काय उत्तर द्यायचं. एखादी व्यक्ती निराशेमध्ये डोकं बिघडल्यासारखं बोलतो त्यावेळी त्याला फार उत्तर द्यायचं नसतं. पण त्यांनी हे भाषण करुन अमित शाह यांनी ते औरंगजेब फॅन क्लबचे आहेत सांगितलं होतं. त्यावरुन आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत हे मात्र उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं आहे," अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
"मी परवा शिवसैनिकांसमोर बोललो. एक तर तू राहशील किंवा मी राहील. माझ्या पायाशी कलिंगड ठेवलं आहे. काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं. पण मी ढेकणांना आव्हान देत नाही. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण. मी म्हणजे संस्कारीत महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणारा पक्ष. मी ढेकणाला आव्हान देत नाही. ढेकणं चिरडायची असतात. कुणीतरी हे आव्हान स्वतःवर घेतलं. त्यानं सांगितलं माझ्या नादाला लागू नका. मी म्हणतो, तुझ्या नादाला लागण्याएवढ्या किंमतीचा तू नाहीच आहेस," अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे यांनी केली.