Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून ५० आमदारांच्या साथीने भाजपासोबत सत्तास्थापना केली. सत्तास्थापना झाल्यानंतर एकनाथ शिंदे अनेक वेळा दिल्लीला भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावरून विरोधकांनी सातत्याने एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. सध्या तुरूंगात असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही शिंदे यांना सुनावले होते. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शिंदे यांच्या दिल्लीवारीवरून टीका केली होती. मात्र, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीवारीवर टीका करणाऱ्या ठाकरे गटाचा खरपूस समाचार घेतला.
"मुंबई दिल्लीसमोर झुकणार नाही. कोण झुकवतंय? असा प्रयत्न कोणीही करत नाहीये. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे आणि दिल्ली ही संविधानाने ठरवून दिलेली राजकीय राजधानी आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीला गेले तर म्हणे ते दिल्लीश्वरासमोरा झुकले. एवढे वर्षे काँग्रेस, राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री होते. शिवसेनेचे मनोहर जोशी होते. सगळे लोक दिल्लीला गेले आहेत. मुख्यमंत्र्याना दिल्लीला जावंच लागतं. राजकीय राजधानी दिल्ली असेल तर दिल्लीला जावंच लागेल, त्याशिवाय आपल्या राज्याचे प्रकल्प पूर्ण कसे होतील? तुम्ही तुमच्या काळात दिल्लीत गेला नाहीत हे खरं आहे. पण जेव्हा तुम्ही गेलात, तेव्हा तुम्ही महाराष्ट्राच्या हिताकरता गेला नाहीत, तर सोनिया गांधींसमोर नतमस्तक होण्याकरता गेलात", असा सणसणीत टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
देवेंद्र फडणवीसांनी शोले स्टाईल डायलॉग मारत उद्धव ठाकरे गटाचा समाचार घेतला आणि खिल्ली उडवली. "माझा उल्लेख करताना कोणीतरी मला अमिताभ बच्चन म्हणाले. पण माझं शरीर अमजद खानसारखे आहे. त्यामुळे मी विचारू शकतो की कितने आदमी थे..... ६५ में से ५० निकल गए और सब कुछ बदल गया", अशी तुफान फटकेबाजी उपमुख्यमंत्र्यांनी केली. "राज्यात काल दहीहंडी उत्सव जोरात साजरा झाला. आता गणेशोत्सव, नवरात्री उत्सव, शिवजयंती, आंबेडकर जयंती सारं काही जोरात आणि जल्लोषात साजरं करायचं आहे. आताचे मुख्यमंत्रीही घरी बसणार नाहीत आणि तुम्हालाही घरी बसू देणार नाहीत", असेही फडणवीस म्हणाले.