उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "कुटुंब फडणवीसांनाही आहे. त्यांच्या कुटुंबातील व्हॉट्सअॅप चॅट बाहेर येत आहेत. आम्ही अद्याप त्यावर बोललेलो नाही. जर फडणवीसांच्या कुटुंबावर बोलावं लागलं, तर त्यांना केवळ शवासन करावं लागेल. त्यांना वेगळी कोणतीही आसनं झेपणार नाहीत. केवळ शवासन, फक्त पडून राहावं लागेल. योगा डे" असं म्हणत उद्धव ठाकरेंनी खोचक टोला लगावला. याला आता देवेंद्र फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
"मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका" असं म्हणत फडणवीसांनी निशाणा साधला आहे. मुंबईला कुणी लुटले, मृतांच्या टाळूवरील लोणी कुणी खाल्ले, मराठी माणसाला कुणी ओरबाडले?, 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे दिले जाते?" याची चिंता करा असं म्हटलं आहे. तसेच "तुमची हास्यजत्रा चालू द्या... बघूच आता शवासन कुणाला करावे लागते ते…" अस म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी"
"मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे! ज्या ‘व्हॉटसअॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत, कारण, लपविण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका."
"मृतांच्या टाळूवरील लोणी कुणी खाल्ले?"
"चिंता करायचीच असेल आणि पुस्तक काढायचेच असेल तर यावर काढा ➡️ सामान्य शिवसैनिकांना वार्यावर सोडून मुख्यमंत्रीपद, मंत्रिपद घरात कसे ठेवले यावर... ➡️ मुंबईला कुणी लुटले यावर...➡️ मृतांच्या टाळूवरील लोणी कुणी खाल्ले यावर... ➡️ मराठी माणसाला कुणी ओरबाडले यावर... ➡️ 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे दिले जाते यावर... तुमचे हिंदूत्त्व आणि तुमचे कारनामे आता एकेक करीत जनतेत उघड होतच आहेत आणि होतच राहणार. आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणार देखील नाही. (नड्डे म्हणजे घसा) तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या... बघूच आता शवासन कुणाला करावे लागते ते…" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.