फडणवीस दोन वर्षानंतरही मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नरंजनातच मग्न; काँग्रेसची खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 06:40 PM2021-10-12T18:40:26+5:302021-10-12T18:41:30+5:30
Atul Londhe : जनतेचा महाविकास आघाडीवर विश्वास असून जनता भाजपाला कायम विरोधी पक्षातच पाहू इच्छिते, त्यामुळे त्यांनी मनाची तयारी करून वास्तव स्विकारावे अशी कोपरखळीही अतुल लोंढे यांनी लगावली.
मुंबई : भाजपा (BJP)सत्तेवरून पायउतार होऊन दोन वर्ष झाली तरी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आजही तेच मुख्यमंत्री असल्याचा भास होत आहे. दोन वर्षांपासून फडणवीस हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत हे वास्तव त्यांनी अजूनही स्विकारलेले नाही. पण स्वप्नरंजनातून बाहेर पडून फडणवीस यांनी वास्तव स्विकारले पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी म्हटले आहे. (Devendra Fadnavis is still dreaming of becoming the Chief Minister even after two years - Atul Londhe)
‘मला आजही वाटते मी मुख्यमंत्री आहे’, असे देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमात म्हणाले, तो धागा पकडून अतुल लोंढे पुढे म्हणाले की, फडणवीस यांना सत्तेचा मोह सुटलेला दिसत नाही. सत्ता हातातून जात आहे असे दिसताच त्यांनी पहाटेचा प्रयोग करुन पाहिला पण त्यांचे ते मुख्यमंत्रीपद हे औटघटकेचे ठरले. त्यानंतरही सतत ‘मी पुन्हा येईन’ ‘मी पुन्हा येईन’, असा घोषणा देत बसले पण पुन्हा काही संधी मिळाली नाही.
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार ( MVA goverment) आज पडणार, उद्या पडणार, या तारखेला पडणार, चार दिवसानंतर पडणार अशा ज्योतिषाच्या तारखा सांगूनही झाल्या पण राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार काही जात नाही उलट ते आजही भक्कम आहे. पण फडणवीसांना मात्र शेखचिल्लीसारखे आजही स्वप्नरंजनातच मग्न होण्यात जास्त रस दिसतो. त्यांनी स्वप्नातून बाहेर पडावे आणि आपण सध्या मुख्यमंत्री नाही तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहोत हे वास्तव स्विकारले पाहिजे.
भाजपात कोण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे तर कोणाला आपलाच नंबर आहे असे वाटते पण देवेंद्र फडणवीस स्वप्नातही मुख्यमंत्रीपदाची खूर्ची सोडायला तयार नाहीत. यातून भाजपातील मुख्यमंत्रीपदाच्या इच्छुकांनी काय तो बोध घ्यावा. जनतेचा महाविकास आघाडीवर विश्वास असून जनता भाजपाला कायम विरोधी पक्षातच पाहू इच्छिते, त्यामुळे त्यांनी मनाची तयारी करून वास्तव स्विकारावे अशी कोपरखळीही अतुल लोंढे यांनी लगावली.