मुंबई : रात्रभराच्या वेगवान घडामोडींनंतर पहाटे, पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून अन् अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून राजभवनावर घेतलेल्या त्या शपथेमागचे रहस्य गुरुवारी विधानसभेत उलगडता उलगडता राहिले. फडणवीस यांनी पवारांना रोखले नसते तर कदाचित अजितदादांनी ते रहस्योद्घाटन केलेही असते.त्याचे असे झाले की आझाद मैदानावर मराठा समाजाचे तरुण आंदोलनास बसले असल्याचा मुद्दा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात उपस्थित केला. या तरुणांना न्याय द्या. अजितदादा तर ऑन द स्पाट निर्णय घेतात. रात्री सर्व घडामोडी घडल्या आणि सकाळी सकाळी त्यांनी शपथच घेतली असे पाटील म्हणाले.तेव्हा यावर आता अजितदादा काय बोलतात हे ऐकण्यासाठी सभागृहात शांतता पसरली. ते बोलायला उभे देखील राहिले व तो रहस्यपट उलगडला जाणार असे सगळ्यांनाच क्षणभर वाटून गेले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खाली बसूनच म्हणाले की, तुम्ही यांच्याकडे (चंद्रकांतदादा) लक्ष देऊ नका, तुम्ही बोलू नका, मी ही बोलत नाही. हे ऐकताच मग मी पण बोलत नाही, असे हसतहसत म्हणत अजितदादा खाली बसले.सोमवारपर्यंत बैठकमराठा समाजातील जे तरूण आझाद मैदानात आंदोलनाला बसले आहेत त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी येत्या सोमवारपर्यंत आपण एक बैठक घेऊ. सर्व संबंधित अधिकारीदेखील या बैठकीला उपस्थित असतील.चंद्रकांत पाटील यांना देखील या बैठकीला बोलाविण्यात येईल व प्रश्नावर तोडगा काढण्यात येईल असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
अजितदादा विधानसभेतच सांगणार होते 'त्या' शपथविधीमागचं रहस्य; इतक्यात...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 4:28 AM