जळगाव - एकजण म्हणाले १५०० रुपयांत काय होते, तुमच्या हातात जेव्हा सत्ता होती तेव्हा फुटकी कवडीही आमच्या माताभगिनींना दिली नाही. आता आम्ही १५०० रुपये देतोय मग तुमच्या पोटात का दुखतंय?, बहिणींनो या सावत्र भावांपासून तुम्हाला सावधान राहावे लागेल. तुम्हाला मिळणारे १५०० रुपये त्यांना पचत नाहीत असं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीउद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
जळगाव येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनिमित्त आयोजित कार्यक्रमात फडणवीसांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून महिन्याला १५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला तर काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं. कुणी तुम्ही महिलांना लाच देता का, महिलांना विकत घेताय का अशी भाषा केली. अरे नालायकांनो, तुम्हाला कधीतरी बहिणीचं प्रेम समजेल की नाही. बहिणीच्या प्रेमाचं मोल नसते. आमच्या बहिणी एकवेळ स्वत: जेवणार नाहीत पण भावाला जेवू घालतील. १५०० रुपयात बहिणीचं प्रेम कुणीच विकत घेऊ शकत नाही. हे १५०० रुपये बहिणींना दिलेली भाऊबीज आहे. राज्याची जितकी क्षमता आहे त्या क्षमतेच्या माध्यमातून बहिणीच्या संसाराला थोडा हातभार लागला पाहिजे म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली असं त्यांनी सांगितले.
तसेच १ कोटी ३५ लाख अर्ज पात्र ठरलेत. ३५ लाख अर्ज असे आहेत ज्यांचे आधारकार्ड बँकेशी लिंक नाही. तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना आधारकार्ड बँकांशी लिंक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. १७ ऑगस्टला पहिला हफ्ता दिला जाणार आहे. कुणाच्या खात्यात पैसे नाही आले तर काळजी करू नका. आधारकार्ड लिंक झाल्यानंतर तुम्हाला सप्टेंबरमध्ये तिन्ही महिन्याचे पैसे येतील. खात्यात काही चूक झाली तर पैसे उशिराने येतील परंतु या काळात तुमचे सावत्र भाऊ येतील आणि बघा पैसे दिले नाहीत असं म्हणतील त्यामुळे या सावत्र भावापासून दूर राहा. तुमचे सख्खे भाऊ मंचावर बसले आहेत. ते तुम्हाला वंचित राहू देणार नाहीत असं सांगत देवेंद्र फडणवीसांनी मविआ नेत्यांना टोला लगावला.
रवी राणांनाही फटकारलं
आमचेही काही मित्र गमतीजमतीनं पैसे परत घेऊ म्हणतात, अरे वेड्यांनो, या देशात कधीच भाऊबीज परत घेतली जात नाही. एकदा भाऊबीज दिली की त्याबदल्यात केवळ माया मिळत असते. निवडणूक येतील जातील, कुणी मत देईल किंवा नाही देणार, परंतु आमच्या पाठिशी मायमाऊलींचा आशीर्वाद असेल आणि जोपर्यंत हे त्रिमुर्ती सरकार आहे तोपर्यंत ही योजना कुणाचा बाप बंद करू शकणार नाही. कुणीही तुमचे पैसे परत घेऊ शकणार नाही असं सांगत फडणवीसांनी रवी राणांना फटकारलं.
बचतगटांना लवकरच बाजारपेठ उपलब्ध करून देणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आमच्या सरकारने राज्यातील महिला शक्तीचा विकास झाला पाहिजे, तसेच महिलांना मागे ठेवून कुठलाही देश पुढे जाऊ शकत नाही असं पंतप्रधान नेहमी म्हणतात. त्यातून महाराष्ट्रातही महिलांना सक्षम करण्यासाठी विविध योजना आणल्या जातायेत. बचत गटाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील १५ लाख बचत गटातील महिला लखपती दिदी बनल्या आहेत. कोट्यवधी महिलांना लखपती दिदी बनवायचा आमचा प्रयत्न आहे. आमच्या माताभगिनी, बचत गटातील महिला कर्जाचा एकही पैसा बुडवत नाहीत. बचत गटांना लवकरच बाजारपेठ देणार आहे. बचत गट महिलांना सक्षम करण्याचं काम करतील असं फडणवीसांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महिलांना ३ सिलेंडर मोफत देण्याची योजना आणली. एसटीमध्ये मोफत प्रवासाची योजना आणली. महिला एसटीत मोठ्या प्रमाणात प्रवास करायला लागल्या. त्यामुळे एसटी फायद्यात आली. महिलांच्या हाती पैसे आले तर ते मुलांसाठी, घरासाठी खर्च करतात. माणसांच्या हाती पैसे पडले तर ते कुठे जातील सांगता येत नाही. कुठल्या व्यसनात खर्च होतील सांगता येत नाही. त्यामुळे महिलांना सक्षम करण्याचा निर्णय आम्ही घेतला असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.