मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ५० आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचं समर्थन काढल्याचं जाहीर केले आहे त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे. त्यात भाजपाने २८ जूनला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन सरकार अल्पमतात असल्याचं निर्दशनास आले असून सरकारला विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्याची सूचना करावी अशी मागणी भाजपा नेत्यांनी केला. त्यानंतर राज्यपालांनी सरकारला ३० जूनला बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिले आहे. दरम्यान, न्यायालयानंदेखील बहुमत चाचणीसाठी स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता उद्याच बहुमत चाचणी होणार आहे.
न्यायालयाच्या या निर्णयानंतर भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. तसंच देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झालाय. आता याची केवळ औपचारिकता बाकी आहे. त्यामुळे आता पुढे भाजप काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल.
यापूर्वी राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. बहुमत चाचणी पुढे ढकलावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात येत होती. एकतर फ्लोअर टेस्ट आठवडाभरासाठी पुढे ढकलणे किंवा इतर बाबीवर सुनावणी लवकर घेणे, हाच समतोल साधण्याचा एकमेव मार्ग आहे असा युक्तिवाद शिवसेनेने मांडला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून सुप्रीम कोर्टाने अर्धातास निकाल राखून ठेवत रात्री ९ वाजता निकाल देणार असल्याचं सांगितले. त्यानंतर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने बहुमत चाचणीला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.