Devendra Fadnavis Jayant Patil: राज्यात सध्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अस्तित्वात आहे. सर्वप्रथम झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव जाहीर केले तेव्हा अनेकांना धक्का बसला होता. पण देवेंद्र फडणवीस यांना भाजपा पक्षश्रेष्ठींनी जेव्हा उपमुख्यमंत्रीपद घेण्याचा सल्ला दिला त्यावेळी ती बाब अनेकांसाठी अधिक धक्कादायक ठरल्याचे दिसून आले. असे असताना आज, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी फडवणीसांना खोचक टोमणा मारला.
"देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असं वाटत होतं. भाजपचा एक मुख्यमंत्री होणारा नेता, पक्षात ताकद वाढवणारा नेता, पंतप्रधान पदाच्या शर्यतीमधील नेता होता... पण असाही योग येऊ शकतो की त्या नेत्याला उपमुख्यमंत्री केले जाते हा महाराष्ट्राचा अपमान आहे हे भाजपाच्या लक्षात कसं येत नाही?", असा खोचक टोला जयंत पाटील यांनी लगावला. आज राज्याच्या पावसाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जयंत पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही टीका केली.
शिंदे हल्ली फडणवीसांना विश्वासात घेत नाहीत!
"एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अस्तित्वात येत असताना काय घडलं याची बरीच चर्चा झाली. सध्या सुप्रीम कोर्टात केस सुरू आहे. मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वासात घेऊन काम करा असे एकनाथ शिंदे यांना सांगतानाच सध्या तुम्ही त्यांना विश्वासात घेत नाही असं एकंदरीत दिसत आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घेतले ते त्यांना माहीत नसतात", असे ते म्हणाले.
"तेव्हा एकनाथ शिंदे यांना शिवसैनिकांच्या वेदना दिसल्या नाहीत का?"
"एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. एकनाथ शिंदे यांची मध्यंतरी एक क्लीप आली होती, भाजपचा अन्याय सहन होत नाही असं बोलून राजीनामा देत आहोत असे ते उध्दव ठाकरे यांना सांगताना दिसत होते. त्याच बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीवांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार केले, तेव्हा एकनाथ शिंदे यांना शिवसैनिकांच्या वेदना दिसल्या नाहीत का?" असा सवालही जयंत पाटील यांनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागच्या रांगेत उभे असलेले अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले!
"एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले होते, त्यावेळी एक फोटो आला होता. औरंगजेबाच्या दरबारात शेवटच्या रांगेत छत्रपती शिवाजी महाराजांना उभे करण्यात आले, तो अपमान समजून छत्रपती शिवाजी महाराज थेट निघून आले होते हे माहीत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागच्या रांगेत उभे असलेले अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले. हा देखील महाराष्ट्राचा अपमान आहे सांगून त्यांनी बाहेर पडायला हवे होते", असेही ते म्हणाले.