Devendra Fadnavis vs Prithviraj Chavan, Sambhaji Bhide Contorversy: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे अनेक वेळा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येतात. त्यांच्या अनेक विधानांमुळे वाद झाले आहेत. सध्या त्यांनी महात्मा गांधींबद्दल केलेल्या विधान वरून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. हा मुद्दा विधिमंडळातही चांगलाच गाजला. संभाजी भिडे हे 'भिडे गुरूजी' नावाने प्रचलित आहेत. पण त्यांना गुरूजी असं संबोधण्यावरून पृथ्वीराज चव्हाणांनी नाराजी व्यक्त केली. पृथ्वीराज चव्हाण यांनी भिडेंना 'गुरूजी' का म्हणावे, याचा पुरावा मागितला. त्यावर उत्तर देताना फडणवीसांनी मजेशीर टिपण्णी केली.
पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
पृथ्वीराज चव्हाण विधिमंडळात बोलताना म्हणाले, "तुम्ही त्या माणसाला (संभाजी भिडे) गुरूजी असं म्हणता. मलादेखील त्यांनी गुरूजी हाक मारण्यास अडचण नाही, पण त्यांना गुरूजी का म्हणता याचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का? तो माणूस फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक असल्याचे सांगतो. तो माणूस बहुजन समाजाच्या मुलांकडून सोनं गोळा करतो, पण त्यांची संस्था रजिस्टर आहे का? त्याचा जमा-खर्च मांडला आहे का? असे काही सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी विचारले. यावर देवेंद्र फडणवीसांनी मजेशीर उत्तर दिले.
फडणवीस काय म्हणाले?
पृथ्वीराज चव्हाण हे राजकारणातील अनुभवी नेते आहेत. त्यांना अनेक लोक पृथ्वी'बाबा' म्हणतात. त्यावर फडणवीसांनी उत्तरात म्हटले, "अध्यक्ष महोदय, त्यांचं नावच भिडे गुरूजी आहे. आता यांचं नाव पृथ्वीराज बाबा आहे. आता बाबा हे नाव कसं आलं याचा पुरावा मी मागू का? असं पुरावा मागता येतो का? हे केवळ मंतांच्या राजकारणासाठी सुरू आहे. हे सारं मतांसाठी चालवण्यात येत आहे." असे मजेशीर मत त्यांनी व्यक्त केले.
संभाजी भिडेंच्या कोणत्या विधानावरून वाद?
"महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते. पण, करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार व त्यांचे खरे वडील आहेत", असा खळबळजनक दावा संभाजी भिडे यांनी अमरावती दौऱ्यात बोलताना केला. त्यावरून प्रचंड वाद पेटला. ठिकठिकाणी त्यांच्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच त्यांच्या अटकेचीही मागणी करण्यात आली आहे.