Devendra Fadnavis vs Ajit Pawar: महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन आज संपले. या अधिवेशनात अनेक मुद्द्यांवरून विरोधक आणि सत्ताधारी समोरासमोर आले. वेगवेगळ्या गोष्टींवरून हेवेदावे झाले. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. काही वेळा काही सदस्यांच्या तोंडून काही विचित्र शब्दही निघाले. पण असे असले तरी सध्या राज्याच्या राजकारणात चर्चा आहे ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नावाची. अधिवेशनात अजित पवार म्हणाले होते की, राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही त्यामुळे मी अमृता फडणवीस वहिनांना याबाबत सांगतो. त्यांनी मनावर घेतलं की सारं नीट होईल. यावर फडणवीस यांनीही अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा उल्लेख केला होता. हे सारं वातावरण खेळीमेळीचं असलं तरी, भाजपाच्या करेक्ट कार्यक्रम करू, या वाक्याला अजित दादांनी त्याच भाषेत उत्तर दिले होते. आता त्यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे. अजितदादांना बहुतेक एका गोष्टीचा फार राग आलेला दिसतोय, अशी कोपरखळीही फडणवीसांनी मारली.
भाजपाकडून २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी भाजपातर्फे ‘मिशन महाराष्ट्र’ राबवण्यात येत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याचं आव्हान बावनकुळेंनी राष्ट्रवादीला दिलं होतं. या आव्हानाचा अजित पवारांनी समाचार घेतला होता. "राज्यात शिंदे-भाजपा सरकार स्थापन झाल्यावर एक नेते बारामतीत आले. तसेच, बारामतीत घड्याळ बंद करत ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार असल्याच्या वल्गना करु लागले. आता आमचं तिथे काम आहे, खरचं ‘करेक्ट कार्यक्रम’ होणार आहे का? जर मनात घेतलं तर, त्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करेन," असं अजितदादा म्हणाले होते. पण आता त्यावर फडणवीसांनी उत्तर दिले आहे.
काय म्हणाले फडणवीस?
"बारामतीत येऊन कोणी आव्हान देणं अजित पवारांना पसंत नसेल. पण राजकारणात कोणी आढळपद घेऊन आलं नाही. इंदिरा गांधी यांच्यासारख्या अतिशय शक्तीशाली नेत्याला देखील निवडणुकीत पराभवाला सामोर जावं लागलं होतं. २०१४ साली सुप्रिया सुळे थोड्या मतांनी निवडून आल्या. बारामती मतदारसंघावर चंद्रशेखर बावनकुळे यांचं लक्ष आहे. ‘मिशन बारामती’ प्रमाणे ‘मिशन महाराष्ट्र’ आहे. ‘मिशन महाराष्ट्र’ अंतर्गत बावनकुळे बारामतीत गेल्यामुळे अजितदादांना बहुतेक फार राग आलेला दिसतोय. पण मी सांगू इच्छितो, की महाराष्ट्रात सगळीकडे आम्ही जातो," असे देवेंद्र फडणवीस नागपूरात प्रसारमाध्यमांशी बोलत असताना म्हणाले.