Devendra Fadnavis vs Sharad Pawar: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बंगळुरुमध्ये एका कार्यक्रमात जत तालुक्यातील गावावरुन धक्कादायक वक्तव्य केले. जत तालुक्यातील ४० गावांवर दावा करण्याच्या तयारीत आम्ही आहोत, असा दावा मुख्यमंत्री बोम्मई यांनी केला होता. यावरुन महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या मुद्द्यावर आज दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या. सकाळी उदयनराजे छत्रपतींनी आपले मत मांडले. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. तर संध्याकाळी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. याच मुद्द्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात विषय संपवला आणि पवार-ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर सडेतोड भाष्य केले.
उदयनराजे छत्रपती यांनी भूमिका मांडल्यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना प्रतिक्रिया द्यावीशी वाटली, असा एका वाक्यात फडणवीसांनी विषय संपवला. "राज्यपालांच्या विधानाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे दैवत आहेत. उदयनराजे महाराज यांनी जाणीव करून दिली, तेव्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे बोलले. सर्वात आधी उदयनराजे छत्रपतींनी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. आणि शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली की उद्धव ठाकरेंना प्रतिक्रिया द्यावीच लागते. या साऱ्या गोष्टींना राजकीय रंग कसा देता येईल असा प्रयत्न सुरू आहे," असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे दैवत आहेत. भारताचा ते आदर्श आहेत. यावर वाद किंवा दुमत असूनच शकत नाही. पण आज जे लोक खडबडून जागे झाले त्याचे कारण उदयनराजे यांनी लिहिलेले पत्र आहे. त्यांनी पत्र लिहिले आणि पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे शरद पवार यांनी पत्रकारांशी या विषयावर संवाद साधला आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली म्हणून उद्धव ठाकरे या विषयावर बोलले," असा टोला त्यांनी लगावला.