राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यापासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आजदेखील त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. आमचे मुख्यमंत्री घरात बसणार नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. तसेच, देवेंद्र फडणवीसांनी शोले स्टाईल डायलॉग मारत उद्धव ठाकरे गटाचा समाचार घेतला आणि खिल्ली उडवली. "माझा उल्लेख करताना कोणीतरी मला अमिताभ बच्चन म्हणाले. पण माझं शरीर अमजद खानसारखे आहे. त्यामुळे मी विचारू शकतो की कितने आदमी थे..... ६५ में से ५० निकल गए और सब कुछ बदल गया", अशी तुफान फटकेबाजी देवेंद्र फडणवीसांनी केली.
आमचे मुख्यमंत्री घरात बसणार नाहीत, आता सगळं जोरात करायचं...
राज्यात काल दहीहंडी उत्सव जोरात साजरा झाला. आता गणेशोत्सव, नवरात्री उत्सव, शिवजयंती, आंबेडकर जयंती सारं काही जोरात आणि जल्लोषात साजरं करायचं आहे. आताचे मुख्यमंत्रीही घरी बसणार नाहीत आणि तुम्हालाही घरी बसू देणार नाहीत. देशाची राजधानी दिल्ली असल्याने मुख्यमंत्र्यांना तिथे जावं लागतं आणि राज्याची कामं करून घ्यावी लागतात. तुम्ही तिथे गेलात पण राज्यासाठी नव्हे तर सोनिया गांधींच्या समोर नतमस्तक होण्यासाठी गेलात, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांनी लगावला.
खरी शिवसेना तीच आहे जी....
"मुंबईमध्ये अनेक फुटबॉलची मैदाने आहेत. त्यामुळे विकासाच्या मार्गात अडथळा म्हणून एखादा फुटबॉल आला तर त्याला कशी किक मारायची हे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलारांनी नीट माहिती आहे. तसेच, अनेक उड्या मारणारी मंडळीदेखील आहेत. पण शेलार हे दोरीउड्या असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहात, त्यामुळे कोणाला किती उडू द्यायचं आणि कोणाची दोरी कधी खेचायची हेदेखील शेलारांनाही कल्पना आहे. मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपा युतीचाच महापौर बनेल. आणि ती शिवसेना म्हणजे माननीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील खरी शिवसेना... ती शिवसेना आणि भाजपा मिळून मुंबई महापालिकेवर भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही", असा निर्धार फडणवीसांनी व्यक्त केला.