Devendra Fadnavis vs NCP: महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) शिवसेनेची घुसमट होत असल्याचा दावा करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केली. शिवसेनेतील (Shiv Sena) बहुसंख्य आमदारांच्या साथीने त्यांनी भाजपासोबत सत्ता स्थापना केली. पण राज्यात ३५ दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त मिळालेला नाही. पहिल्या दिवशी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. भाजपाकडे १००पेक्षा जास्त आमदार असूनही देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यानंतर, शिंदे गटाला कोणती मंत्रिपदं मिळणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. असं असताना आता, राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी भाजपाकडे जास्त जागा असतानाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री का झाले नाही, या संदर्भात एक दावा केला आहे.
"भाजपाकडून आत्ताच्या घडीला म्हणूनच मुख्यमंत्रीपद घेतलं गेलं नसेल. कारण अपात्र ठरले तर मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी अपात्र ठरतील. मग परत भाजपा मुख्यमंत्रिपदावर दावा करू शकतो, अशा प्रकारची रणनीती भाजपाची असू शकते. या सर्व गोष्टीचं प्लॅनिंग भाजपाच्या तज्ज्ञ मंडळींच्या माध्यमातून चाललेलं असल्यामुळे या बाबतीत (मंत्रिमंडळ) निर्णय घेतलेला नाही. सरकार बनवलं आणि लगेच जर कोर्टाचा निर्णय विरोधात गेला तर नामुष्की होऊ शकते. त्याचा तोटा भाजपाला होऊ शकतो म्हणून ते 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आहेत", असा दावा शशिकांत शिंदे यांनी केला.
शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाकडून विविध याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या आहेत. १६ आमदारांच्या अपात्रेपासून सर्वच प्रकारच्या याचिकांवर सुनावणी सोमवारी होणार आहे. त्यामुळे मंत्रिमडळ विस्तार पुन्हा लांबणीवर पडल्याचे सांगितले जात आहे. मात्र, फडणवीस यांच्या दिल्ली बैठकीत भाजपाची मंत्रिमंडळातील नावे अंतिम झाल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून अधिकची मंत्रिपदे आणि विशिष्ट खात्यांचा आग्रह धरला जात असल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत नक्की कोणाला कोणतं मंत्रिपद मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.
दरम्यान, लांबत चाललेल्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे आता भाजप आणि शिंदे गटातील आमदारांमध्येही अस्वस्थता वाढत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील ५० आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आमदारांना संयम ठेवण्याचा सल्ला देण्यात आल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यांच्या मनातील संभ्रम दूर करण्याबाबतही चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.