मुंबई: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला जाण्यापूर्वीच सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. विधानसभेचं अधिवेशन नियमबाह्य आणि असंवैधानिक पद्धतीनं बोलवण्यात आल्याचा आक्षेप फडणवीस यांनी नोंदवला. सरकारनं नव्या हंगामी अध्यक्षांची पायमल्ली केल्याचा आरोप करत संविधानाची पायमल्ली झाल्याचं फडणवीस म्हणाले. मात्र विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी अनेक तांत्रिक बाबी सांगत फडणवीस यांचे आक्षेप खोडून काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर फडणवीस यांच्यासह भाजपाच्या आमदारांनी सभात्याग केला.भाजपा आमदारांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विटरवरुन विरोधकांना लक्ष्य केलं. 'अशी एक चर्चा आहे की, भाजप अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं स्वागत करायला देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व नेत्यांना जायचे होतं. म्हणूनच भाजपनं सभागृहातून पळ काढला', असं ट्विट सचिन सावंत यांनी केलं. काल विधानसभेत विश्वासदर्शक ठराव आणला जाण्यापूर्वीच भाजपा आमदार सभागृहातून बाहेर पडले.