मुंबई : केंद्रात मोदी सरकार आल्यापासून देशात तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातोय असा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत आलाय. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील 9 प्रमुख नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केंद्रीय तपास यंत्रणेच्या गैरवापराबाबत आरोप लावले आहेत. या पत्रात विरोधकांनी सीबीआय, ईडीसारख्या संस्थाचा दुरुपयोग होत असल्याचं सांगत भाजपावर थेट निशाणा साधला आहे. यावर भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
2014 मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपची सत्ता आली. तेव्हापासून अनेक विरोधी नेत्यांवर विविध प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. यातील काही नेत्यांना अटक झाली, तर काहींवरील चौकशी अद्याप सुरू आहे. विशेष म्हणजे, ज्या नेत्यांनी या काळात भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांच्याविरोधातील तपासाची गती मंदावली आहे किंवा त्या नेत्यांची प्रकरणातून सुटका झाली आहे. याचीच तक्रार विरोधी पक्षाच्या नेत्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणतात की, 'देशात यंत्रणांचा गैरवापर कुठेही झालेला नाही. जो गैरमार्गाने पैसे कमावतो, फक्त त्यांच्यावरच कारवाई होत आहे. यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाही. अशाप्रकारचे पत्र लिहून कुणाचीही सुटका होणार नाही. यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे भ्रष्टाचार आणि गैरमार्गाने पैसा कमावणे बंद करा.'
'भाजपमध्ये आल्यामुळे कुणाचीही कारवाई बंद झालेली नाही. असे असेल तर विरोधकांनी एखादे उदाहरण द्यावे. कारवाई चुकीची झाली असेल तर न्यायालय आहेच, तिथे न्याय मिळेल. विरोधी पक्षातून भाजपमध्ये कोणी प्रवेश केला तर त्यांची चौकशी बंद होते, असे नाही. कुणाचीही चौकशी बंद झाली नाही,' असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.