शेगाव - शिवरायांचा अपमान करणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांची पाठराखण करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोला यांनी जोरदार टीका केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोश्यारी आणि त्रिवेदी यांची पाठराखण करत आहेत हे अत्यंत दुर्देवी आहे. फडणवीसांना आता शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार राहिलेला नाही, असा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून टीका करताना नाना पटोले म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वारंवार महाराष्ट्रातील महापुरुषांचा आणि समाजसुधारकांचा अपमान करत आहेत. महापुरुषांचा अवमान करणे हाच भाजपचा अजेंडा आहे. भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे त्यांचा निषेध करण्याऐवजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांची पाठराखण करत आहेत हे अत्यंत दुर्देवी आहे. फडणवीसांना आता शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार राहिलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वारंवार वादग्रस्त वक्तव्ये करून आणि खोटी माहिती पसरवून महाराजांचा अपमान करून भाजप नेते आणि विविध पदांवर त्यांनी बसवलेले संघाचे बाहुले आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन करत आहेत. महाराष्ट्रातील जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे नाना पटोले म्हणाले.
शेगाव येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना नाना पटोले यांनी पिकविम्याचा प्रश्नही उपस्थित केला. ते म्हणाले की, भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून प्रवास करत असताना हजारोंच्या संख्येने शेतकरी राहुलजींना भेटले, अतिवृष्टी, पुरामुळे प्रचंड नुकसान झाल्याचे सांगितले तसेच पीक विमा कंपन्यांकडून अद्याप मदत मिळाली नसल्याचे सांगितले. त्यांनी मांडलेली व्यथा पाहून या शेतक-यांच्या मदतीसाठी लढा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यासाठी राज्यातील सर्व जिल्हा व तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पीक विमा मदत कक्ष स्थापेन करण्यात येणार आहे. ज्या शेतक-यांनी पीक विमा भरला आहे पण त्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही अशा शेतकऱ्यांचे नाव, मोबाईल क्रमांक व पीकविमा भरल्याची पावती (झेरॉक्स) ही कागदपत्रे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पीकविमा कक्षात जमा करून घेण्यात येणार आहेत. राज्यातील शेतक-यांना पीकविमा मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष पाठपुरावा करून लढाई लढेल असे पटोले म्हणाले.
पीक विमा कंपन्या सरकारी आशिर्वादाने प्रचंड नफेखोरी करत आहेत. शेतक-यांना मदत करण्याऐवजी विमा कंपन्याकडून गरीब शेतक-यांची लूट सुरु आहे. त्यांची ही मनमानी आता खपवून घेतली जाणार नाही. या कंपन्यांविरोधात काँग्रेस पक्ष आता मैदानात उतरणार असून कंपन्यांनी शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई दिली नाही तर त्या विमा कंपन्यांना महाराष्ट्रात काम करु दिले जाणार नाही असा स्पष्ट इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिला आहे.