मुंबई : गेल्या काही दिवसापासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आरोप-प्रत्यारोपात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्याबाबत अनेक खळबळजनक दावे केले आहेत, यावरून राजकीय वर्तुळात अनेक आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत.
राजकीय फायद्यासाठी विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी मविआतील नेत्यांकडून माझ्यावर दबाव आणला जात होता, असा मोठा दावा परमबीर सिंग यांनी केला होता. यासंदर्भात परमबीर सिंग जे बोलले ते खरे आहे. माझ्या अटकेसाठी महाविकास आघाडीने काही अधिकाऱ्यांना सुपारी दिली होती. आम्ही त्याचा पर्दाफाश करू शकलो, अशी देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली होती. यावरून आता अनिल देशमुख यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. यासंबधी अनिल देशमुख यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.
अनिल देशमुख यांनी लिहिलं आहे की, "वा... देवेंद्र फडणवीस जी! मी १५ दिवसापूर्वी, तुम्ही ३ वर्षापूर्वी कसे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना तुरुगांत टाकण्यासाठी कटकारस्थान रचले होते, ते मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणले. आता तुम्ही माझ्यावर आरोप करण्यासाठी सचिन वाझे जो देशद्रोहाच्या व २ खुनाच्या गुन्ह्यांमध्ये ३ वर्षांपासून जेलमध्ये आहे, तसंच परमबीर सिंग ज्याने ३ वर्षापूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवले आणि नंतर स्कॉर्पिओ गाडीच्या मालकाची हत्या करणे या दोन्ही गुन्हाचा सुत्रधार आहे. असा आरोपी परमबीर सिंग याला पुढे केले आहे."
"आता दोघेही देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन पोपटा सारखे बोलत आहे. वरील दोन्ही प्रकरणाचा मुळे सुत्रधार परमबीर असल्यामुळे आम्ही त्याला ३ वर्षापुर्वी निलंबित केले. त्याला ३ वर्षापूर्वी केंद्रीय एजन्सीकडून अटक होणार होती. पण तो भाजपला शरण गेला आणि आता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे आरोप करीत आहे. देवेंद्र फडणवीस, तुम्ही १५ दिवस का शांत होता, आता माझ्यावर आरोप करावयाचे तुम्हाला आठवले काय?", असा सवाल देखील अनिल देशमुख यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
काय म्हणाले होते फडणवीस?यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना भाष्य केलं. ते म्हणाले, परमबीर सिंग जे बोलले ते खरे आहे. माझ्या अटकेसाठी महाविकास आघाडीने काही अधिकाऱ्यांना सुपारी दिली होती. आम्ही त्याचा पर्दाफाश करू शकलो. मी, प्रवीण दरेकर, गिरीश महाजन अन्य काही नेते यांना जेलमध्ये टाकण्याची सुपारी दिली होती. पण काही चांगल्या अधिकाऱ्यांनी खोट्या केसेस टाकण्यास नकार दिला. तसंच, माझ्या अटकेसाठी एकदा नाही तर चार वेळा प्रयत्न झाले. पण यांना काही मिळाले नाही. यांचे व्हिडीओ पुरावे सीबीआयला देण्यात आले आहेत. आजही आमच्याकडे अनेक व्हिडीओ पुरावे आहेत. योग्यवेळी ते सादर करू, असा इशाराही देवेंद्र फडणवीस फडणवीस यांनी दिला आहे.