मुंबईः राज्याचे विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवर चिंता व्यक्त केली आहे. त्यासंदर्भात फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी अनेक मागण्या केल्या आहेत. मुंबईत मोठ्या प्रमाणात कमी होत असलेल्या चाचण्या, राज्यात मृत्यूसंख्येत सातत्याने होत असलेली वाढ चिंताजनक आहे. तसेच मृत्यू प्रमाणपत्रात नैसर्गिक अथवा अन्य कारण नमूद करून अंत्यविधीसाठी मृतदेह दिले जात असल्याने निर्माण झालेले धोक्यांकडेही त्यांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं आहे. मृत्यू प्रमाणपत्रात अन्य काही कारण नमूद करून अंत्यविधीसाठी दिलेल्या काही मृतदेहांचा कालांतरानं चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याकडे विशेष लक्ष देण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पत्रात फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उद्देशून लिहितात, कोरोनाच्या संकटाचा सामना करीत असताना मुंबईत सातत्यानं कमी चाचण्या होत असल्याकडे यापूर्वीसुद्धा मी आपले लक्ष वेधले आहे आणि आता राज्यात कोरोनाबळींची संख्या दिवसेंदिवस नवे उच्चांक गाठत असताना आज पुन्हा या महत्त्वाच्या विषयाकडेच मला आपले लक्ष वेधायचे आहे. १ मे २०२० रोजी महाराष्ट्रातील एकूण चाचण्यांमध्ये मुंबईतील चाचण्यांचे प्रमाणे हे ५६ टक्के होते. याचा अर्थ अर्ध्याहून अधिक चाचण्या या कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या मुंबईत होत होत्या, १५ मे २०२० रोजी हे प्रमाण ४०.५ टक्क्यांवर आणण्यात आले आणि आता ३१ मे २०२० रोजीची आकडेवारी पाहिली तर एकूण महाराष्ट्रातील चाचण्याच्या तुलनेत मुंबईतील चाचण्यांचे प्रमाण हे २७ टक्क्यांवर आले आहे. म्हणजेच पूर्वी होणाऱ्या चाचण्यांपैकी ५० टक्क्यांहून कमी आलेली आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या मुंबईत चाचण्यांची कमी होणारी संख्या ही निश्चित चिंताजनक बाब आहे.
काल मुंबई निसर्ग वादळातून वाचली. एनडीआरएफ, एसडीआरएफ यांसारख्या संस्थांनी चांगलं काम केलं. ते सारेच कौतुकास पात्र आहेत. पण कोरोनाच्या घोंघावत असलेल्या वादळाचीसुद्धा आपल्याला तितक्याच गांभीर्यानं दखल घ्यावी लागेल. मुंबईत चाचण्याची संख्या वाढवावीच लागेल, कोरोना बळी स्पष्टपणे दर्शविले, तरच त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे विलगीकरण होईल आणि परिणामी कोरोना आणखी पसरण्यापासून रोखता येईल. १० हजार चाचण्यांची क्षमता असताना केवळ ३५०० ते ४००० चाचण्याच मुंबईत होत आहेत. कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी-अधिक दाखवून फायदा नाही, तर कोरोनाच्या प्रादुर्भावाला अटकाव आवश्यक आहे. आपण या प्रश्नात लक्ष घालाल, अशी आशा आहे. असे केल्यास कोरोना वादळापासून आपली सुटका लवकर होणे शक्य आहे, असा सल्लाही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
हेही वाचा
राज्यसभा निवडणुकीआधी काँग्रेसला धक्का; गुजरातच्या दोन आमदारांचा राजीनामा
चीनच्या 'या' मोठ्या मोबाइल कंपनीकडून भारताची फसवणूक, तुम्हालाही घातला जाऊ शकतो गंडा?
PoKमध्ये बौद्धांच्या वारशाला धक्का; गिलगिट-बाल्टिस्तान रिकामी करा; भारताचा पाकला कडक इशारा
Cyclone Nisarga: चक्रीवादळाने दिशा बदलल्याने मुंबई अन् ठाण्यातील मच्छीमारांसाठी धोका टळला