राज्यातील बहुतांश भागांना आज मुसळधार पावसानं झोडपून काढलं. त्यामुळे पुणे, कोल्हापूरसह अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. मुंबई आणि ठाणे परिसरातही अनेक ठिकाणी पूरस्थितीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, पुढचे काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पुरस्थिती आणि धरणांमधून होणाऱ्या विसर्गाबाबत ट्विट करून महत्त्वाची माहिती दिली आहे.
या ट्विटमध्ये माहिती देताना देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले की, राज्यात अनेक भागात मोठा पाऊस असल्याने काही धरणांतून पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. याबाबतीत मी सातत्याने सिंचन विभागाशी संपर्कात असून, सिंचन अधिकार्यांना स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, खडकवासलातून 35,300 क्युसेक इतका विसर्ग होत होता. तो आता 40,000 क्युसेक इतका विसर्ग होत आहे. उद्या सकाळी पावसाची स्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यास सांगण्यात आले आहे. याची संपूर्ण माहिती पुणे महापालिकेला सातत्याने देण्यात येत आहे. कोयनेतून सध्या 20,000 क्युसेक इतका विसर्ग सुरु असून, तो पहाटे 3 वाजता 30,000 क्युसेक इतका होईल. सकाळी 9 वाजता तो 40,000 क्युसेक इतका होण्याची शक्यता आहे. सिंचन विभागात सातत्याने जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात आहे.
या ट्विटमधून कोल्हापूरमधील पुराचं कारण ठरणाऱ्या अलमट्टी धरणातील पाणीपातळीबाबतही फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, महाराष्ट्र सरकार सातत्याने कर्नाटक सरकारशी संपर्कात आहे. कर्नाटकचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि अलमट्टी धरणाचे मुख्य अभियंता यांच्याशी सातत्याने संवाद होतो आहे. 517.5 मीटर इतकी पाणीपातळी (एफआरएल) कायम ठेवण्यास सांगण्यात आले आहे आणि ते कर्नाटक सरकारने मान्य केले आहे.