BJP vs NCP, Devendra Fadnavis: महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजपा विरूद्ध तीन पक्ष असा संघर्ष नेहमी पाहायला मिळतो. दररोज सत्ताधारी पक्षातील नेतेमंडळी आणि विरोधी पक्षातील नेतेमंडळी एकमेकांवर सडकून टीका करत असल्याचे दिसते. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गेल्या काही दिवसांपासून सत्ताधाऱ्यांवर बरसत आहेत. या दरम्यान, राष्ट्रवादीकडून त्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. फडणवीस हे गजनी सिनेमातील आमीर खानसारखे (Aamir Khan) असल्याचा टोला राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी लगावला.
"गजनी सिनेमात आमीर खान हा आपण कोण आहे, हे विसरतो आणि डायरीत लिहून ठेवतो. अगदी तसंच आता देवेंद्र फडणवीस यांनाही लिहून ठेवावं लागणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या काही वक्तव्यांना 'गजनी' सिनेमातील 'आमीर खान'ची उपमा देत त्यांनी विरोधी पक्षनेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस यांना 'स्मृतिभ्रंश' झालाय असं वाटतं, कारण कधी ते बाबरी मशीद पाडली जात असताना तिथे उपस्थित होतो असं बोलतात, तर आता ते कदाचित १८५७च्या बंडात तात्या टोपे यांच्यासोबत लढलो असेन असंही बोलतात. राज्यातील सत्ता गेल्याने त्यांना एवढा मोठा शॉक लागला आहे का, असा खोचक सवालही क्लाईड क्रास्टो यांनी यावेळी केला.
फडणवीस यांनी १९५७च्या उठावाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनीही त्याच्यांवर पलटवार केली. "थोडा इतिहासाचा अभ्यास केला, तर कुठेही इंग्रजांवर केंद्रीय यंत्रणाच्या धाडी पडल्यात किंवा तेथे सरकार पडले, असे कधी जाणवले नाही. उलट इथे 'डिव्हाइड अँड रुल' व्हायचे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मागच्या जन्मात नक्की कोणत्या बाजूने होते, हे शोधावे लागेल, अशी खरमरीत टीका आदित्य ठाकरे यांनी केली.