मुंबई - गेल्या काही दिवसांत सीमाभागात घडलेल्या काही घडामोडी आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानांमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावादा पुन्हा एकदा पेटला आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमावादाबाबत मोठं विधान केलं आहे. सीमावादाबाबत कर्नाटकही निर्णय घेऊ शकत नाही आणि महाराष्ट्रही निर्णय घेऊ शकत नाही. तर याबाबतचा अंतिम निर्णय हा सर्वोच्च न्यायालय घेणार आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
आज प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला सुरू आहे. त्यामुळे याबाबत कर्नाटकही निर्णय घेऊ शकत नाही आणि महाराष्ट्रही निर्णय घेऊ शकत नाही. जो काही निर्णय असेल तो सर्वोच्च न्यायालय घेणार आहे. मला असं वाटतं की, त्यामुळे या संदर्भात विनाकारण नव्याने कुठलाही वाद निर्माण करणं योग्य ठरणार नाही. सीमावादाच्या खटल्यामध्ये महाराष्ट्राने सर्वोच्च न्यायालयासमोर अतिशय ताकदीने बाजू मांडली आहे. आता आपल्याला न्याय मिळेल असा विश्वास ठेवला पाहिजे.
दरम्यान, राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्याबाबतची फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ते म्हणले की, मंत्र्यांचा बेळगाव दौरा हा महापरिनिर्वाण दिनानिमित्त होता. त्यासाठी एका कार्यक्रमाला मंत्री जाणार होते. त्यात महाराष्ट्राचं काही म्हणणं आहे. कर्नाटकचं काही म्हणणं आहे. मंत्र्यांनी ठरवलं तर ते जाऊ शकतात. त्यांना जाण्यापासून कुणी रोखू शकणार नाही. मात्र महापरिनिर्वाण दिनी असा वाद तयार करायचा का हा महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे यासंदर्भात काही ना काही विचार आम्ही करतोय. माननीय मुख्यमंत्री आम्हाला याबाबत अंतिम निर्णय देतील. महापरिनिर्वाण दिन आमच्यासाठी मोठा दिवस आहे. त्यादिवशी एखादं आंदोलन व्हावं. कुठलीही चुकीची घटना व्हावी हे योग्य नाही. भविष्यात आपल्याला तिथे जाता येईल. तिथे जाण्यापासून कुणी रोखू शकणार नाहीत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.