हजारोंच्या उपस्थितीत राज्यारोहण : देवेंद्र फडणवीस यांच्यासह दहा जणांचा शपथविधी
महाराष्ट्राच्या इतिहासात डोळ्यांचे पारणो फिटवणारा आणखी एक शपथविधी सोहळा सा:या देशाला पाहायला मिळाला. तब्बल 4क् हजारांहून अधिक प्रेक्षकांनी या सोहळ्याला प्रत्यक्ष हजेरी लावली.
मुंबई : अरबी समुद्रातील मावळतीच्या सूर्याला साक्षी ठेवून आणि वानखेडे स्टेडियममधील हजारो चाहत्यांनी केलेल्या टाळ्य़ांच्या गजरात महाराष्ट्राचे अठरावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांनी शुक्रवारी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. फडणवीस यांच्यासह एकूण दहा जणांनी या वेळी शपथ घेतली. त्यामध्ये दोन राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.
भाजपाप्रणीत सरकारच्या मंत्रिमंडळाचा भव्यदिव्य शपथविधी याचि देही याचि डोळा पाहण्याकरिता दुपारपासून चर्चगेट परिसरातील रस्ते तुडुंब गर्दीने भरले होते. तशीच भरगच्च गर्दी वानखेडे स्टेडियममध्ये होती. व्यासपीठावर भाजपाचे केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री, विविध राज्यांतील मुख्यमंत्री, नेते, धर्मगुरू आदी हजर होते. ठीक चार वाजून 25 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे आगमन झाले. लागलीच स्टेडियममधील जनसमुदाय मोदींच्या जयजयकाराच्या घोषणा देत उभा राहिला. राष्ट्रगीतानंतर शपथविधी सोहळ्य़ाला आरंभ करण्याची अनुमती राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे मागितली.
देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच मंत्र्यांनी ‘ईश्वरसाक्ष’ शपथ घेतली. फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच स्टेडियममध्ये टाळ्य़ांचा गजर झाला. एकनाथ गणपतराव खडसे यांनाही शपथ घेतल्यावर ‘नाथाभाऊ.. नाथाभाऊ ङिांदाबाद’ करीत एका कोप:यातून प्रतिसाद लाभला. सुधीर मुनगंटीवार यांनी खणखणीत स्वरात शपथ घेतली. विनोद श्रीधर तावडे यांनी आपल्या वडिलांबरोबर आईच्या ‘विजया’ या नावाचा आवजरून उल्लेख केला व शपथ घेतली. प्रकाश मनसुखभाई महेता व चंद्रकांत बच्चू पाटील यांनीही शपथ घेतली. पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी शपथ घेतली, तेव्हा सर्वाधिक टाळ्य़ांचा गजर झाला. विष्णू रामा सवरा व दिलीप ज्ञानदेव कांबळे यांचा समावेश झाल्याने अनुसूचित जाती-जमातीचा समतोल राखला गेला. विद्या जयप्रकाश ठाकूर यांनी मराठीत शपथ घेतली हे वैशिष्टय़पूर्ण असले तरी त्यांनी चुकून ‘खरेदी’ हा शब्द वापरताच उपस्थितांमध्ये खसखस पिकली. स्टेडियममध्ये एका बाजूला दीनदयाळ उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी, वसंतराव भागवत, हशू अडवाणी, प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांची छायाचित्रे लावली होती, तर दुस:या बाजूला अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, नरेंद्र मोदी व अमित शहा यांची छायाचित्रे लावली होती. शपथविधी सोहळा जेमतेम 27 मिनिटांत संपला. या ठिकाणाहून बाहेर पडण्याकरिता प्रचंड गर्दी झाल्याने अनिल अंबानी, गोदरेज, हिरानंदानी यांच्यासह अनेक तारे-तारकांना गर्दीतून वाट काढत व बॅरिकेडचे अडथळे पार करीत घामाघूम होऊन जावे लागले. शपथविधीनंतर जेमतेम पाच ते सात मिनिटांत मोदींनी व्यासपीठ सोडले.
अंबानी, बिर्ला हजर
शपथविधीला अनिल अंबानी, आदी गोदरेज, कुमारमंगलम बिर्ला, निरंजन हिरानंदानी हे उद्योगपती व व्यावसायिक हजर होते. मुकेश अंबानी, रतन टाटा हे उद्योगपती मात्र या वेळी हजर नव्हते. तसेच अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर हेही हजर राहिले नाहीत.
साधू, संत व महंतांच्या उपस्थितीवर टीका
शांतीगिरी महाराज, भय्यू महाराज, महंत योगेशबुवा पुरोहित, मनोहरबुवा दीक्षित, नरेंद्र महाराज, जगद्गुरू रामानंद, स्वरूपानंद सरस्वती, भगवान गडाचे नामदेव शास्त्री महाराज आदी साधू, संत आणि महंतांची व्यासपीठावर गर्दी होती. सरकारी शपथविधी सोहळ्याला अशा बाबा-बुवांना का निमंत्रित केले गेले, असा सवाल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना सत्यसाईबाबा माङया बंगल्यावर आले तेव्हा भाजपाने त्यावर टीका केली होती; आता कुठे गेली अंधश्रद्धा?
मान्यवरांची उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, अध्यक्ष अमित शहा, अनंतकुमार, रविशंकर प्रसाद, निर्मला सीतारामन, व्यंकय्या नायडू हे भाजपाचे केंद्रीय नेते. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू, मध्य प्रदेशचे शिवराजसिंह चौहान, राजस्थानच्या वसुंधराराजे शिंदे व पंजाबचे प्रकाशसिंग बादल हे हजर होते. याखेरीज विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख व माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील हेही उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ, जयंत पाटील आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे व्यासपीठावर बसले होते. शिवसेनेतर्फे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांनीही हजेरी लावली.