मुंबई : देवेंद्रजी! विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही पुढची पाचदहा वर्षे असेच पुस्तक लिहीत राहा म्हणजे आम्हाला आमच्या उणिवा कळतील व आम्ही पुढे जात राहू अशी कोपरखळी काढतानाच अतिशय सोप्या भाषेत अर्थसंकल्प म्हणजे काय हे सांगणारे मराठीतील पहिले पुस्तक लिहिले हे प्रशंसनीय असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केले.फडणवीस यांनी लिहिलेल्या, ‘सोप्या भाषेत अर्थसंकल्प’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विधानभवनात झाले. राष्ट्रकुल सांसदीय मंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक आणि स्वत: फडणवीस प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, सर्वात आधी मी हे पुस्तक वाचून अर्थसंकल्प समजून घेईन. सर्वसामान्यांनी दिलेल्या करातून अर्थव्यवस्था उभी राहते आणि त्याच्याशी संबंधित असा हा अर्थसंकल्प सोपा करून सांगणे हे कठीण काम फडणवीस यांनीकेले आहे.अर्थसंकल्प सोप्या भाषेत समजावून सांगण्याची वेळ येण्यापेक्षा अर्थसंकल्पच सोप्या भाषेत का मांडला जाऊ नये, अशी भावना सभापती रामराजे निंबाळकर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, विविध संसदीय आयुधांचा नेमका आणि कमीत कमी वेळेत वापर कसा करावा यावरही फडणवीस यांनी पुस्तक लिहावे. टीव्ही अँकर आणि रिपोर्टरना पण अर्थसंकल्प समजून सांगितला पाहिजे, असा चिमटा त्यांनी काढला.>दिल्लीत पाठविण्यासाठी ठराव :फडणवीस हे चांगले साहित्यिक आहेत. त्यांच्या अभ्यासाचा गौरव म्हणून आम्ही सर्व २८८ आमदार त्यांना दिल्लीत पाठविण्यासाठी ठराव करू, म्हणजे आम्हाला सुगीचे दिवस येतील. माजी राज्यपाल राम नाईक यांनी त्यासाठी दिल्लीत बोलावे. फडणवीस दिल्लीत गेले तर सुधीर मुनगंटीवार अधिक खूश होतील, असा चिमटा काढत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खसखस पिकविली.>मी देखील या कार्यक्रमात पाहुणा आहे या फडणवीस यांच्या वाक्याचा संदर्भ देत, ‘सगळं करून नामनिराळं कसं राहावं यावरही तुम्ही एक पुस्तक लिहा, असे निंबाळकर यांनी म्हणताच हशा पिकला. नाना पटोेले, प्रवीण दरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीही यावेळी भाषणे झाली. फडणवीस म्हणाले, अर्थसंकल्प हा माझा आवडीचा आणि अभ्यासाचा विषय राहिला आहे. त्यातूनच सदस्यांना अर्थसंकल्प समजावा म्हणून मी हे पुस्तक लिहिले आहे. सदस्यांना पुढेही तो समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी माझी नेहमीच तयारी असेल.
देवेंद्रजी! तुम्ही लिहीत राहा म्हणजे आम्हाला उणिवा कळतील
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 4:00 AM