मुंबई : नाशिक कर्मचाऱ्यांचे वेतन व कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचे ५७ लाख रुपये अपहाराप्रकरणी, माजी खासदार देवीदास पिंगळे यांचा बुधवारी उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. त्यांना एपीएमसीच्या सर्व व्यवहारापासून दूर राहण्याची व चार महिने नाशिकमध्ये न राहण्याची अट उच्च न्यायालयाने घातली आहे.एसीबीने ५७ लाख ७३ हजार ८०० रुपये एका कारमधून जप्त केले. त्यावरून, पोलिसांनी कारमधील तिघांची आणि त्यानंतर पिंगळे यांची चौकशी केली. पिंगळे यांची तब्बल दोन तास चौकशी करण्यात आल्यानंतर, २२ डिसेंबर रोजी त्यांना अटक करण्यात आली. एपीएमसीच्या कर्मचाऱ्यांकडून पिंगळे लाच घेत असल्याचा आरोप एसीबीने केला आहे. ही रक्कम बेहिशेबी असल्याचेही एसीबीने म्हटले आहे. मात्र, ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची असल्याचा दावा पिंगळे यांनी केला होता. २९ डिसेंबर रोजी नाशिक सत्र न्यायालयाने पिंगळेंचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे पिंगळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. बुधवारच्या सुनावणीत एसीबीने पिंगळे याच्यावर दोषारोपपत्र दाखल केल्याची माहिती न्या. मृदुला भाटकर यांना दिली. ही बाब लक्षात घेत, न्या. भाटकर यांनी ४० हजारांच्या हमीवर देवीदास पिंगळे यांचा जामीन मंजूर केला. मात्र, त्यांना नाशिक एपीएमसीच्या बैठकीत, तसेच एपीएमसीशी संबंधित आर्थिक निर्णय किंवा व्यवहार न घेण्याची अट उच्च न्यायालयाने घातली आहे. त्याशिवाय चार महिने त्यांना नाशिकमध्ये न राहाण्याची अटही उच्च न्यायालयाने घातली आहे. पिंगळे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर नाशिकरोड कारागृहात ठेवण्यात आले. (प्रतिनिधी) >याचिकेत आरोप‘हा गुन्हा केवळ कागदोपत्री आहे. ज्यांच्याकडून पैसे जप्त करण्यात आले, त्या आरोपींची जामिनावर सुटका झाली आहे. केवळ राजकीय हेतूपोटी आपल्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. एसीबीच्या आरोपांत काहीही तथ्य नाही,’ असे पिंगळे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.
देवीदास पिंगळे यांना सशर्त जामीन
By admin | Published: April 06, 2017 5:39 AM