वाशिम, दि. २- रामनवमी आणि संत सेवालाल महाराज जन्मोत्सवानिमित्त बंजारा समाजाची काशी म्हणून भारतभरात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र पोहरादेवी येथे भव्य यात्रा भरते. त्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, गुजरात, कर्नाटक, राजस्थान आदी राज्यांमधील भाविक पोहरादेवीत डेरेदाखल झाले आहेत. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मंत्र्यांनीही पोहरादेवीत उपस्थिती दर्शवून संत सेवालाल महाराजांचे दर्शन घेतले.विश्वशांतीसाठी अखिल भारतीय बंजारा शक्तिपीठाच्या वतीने २४ मार्चपासून लक्षचंडी महायज्ञ सुरू करण्यात आला आहे. या महायज्ञाची सांगता ३ एप्रिल रोजी होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोहरादेवी येथे जमलेल्या बंजारा समाज बांधवांना त्यांच्या बोलीभाषेतून साद घातली. गेल्या दोन वर्षांंंंंपासून पोहरादेवी येथील यात्रेला येण्याची इच्छा होती, आज ती पूर्ण झाल्याने आनंद झाल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त करताच उपस्थितांनी टाळ्याच्या गजरात प्रतिसाद दिला.पोहरादेवी हे ठिकाण देशातील कष्टकरी व श्रमिक जनतेचे श्रद्धास्थान असल्याची भावना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. पोहरादेवी ही बंजारा समाजाची काशी आहे. अशा या पवित्र धार्मिकस्थळी जो लक्षचंडी यज्ञ सुरु आहे, त्यात अहंकार, व्यसन आणि भ्रष्टाचार याची आहुती देण्याचे आवाहन मुंडे यांनी केले.बोकडबळी प्रथेला ब्रेकसंत सेवालाल महाराजांची समाधी व जगदंबा देवीचे मंदिर असलेल्या पोहरादेवी येथे दरवर्षी रामनवमी व संत सेवालाल महाराज जन्मोत्सवानिमित्त भव्य यात्रा भरते. बोकडबळी प्रथा थांबविण्यासाठी संत, महंत, सामाजिक कार्यकर्ते तथा प्रशासनाने प्रयत्न केले. त्यामुळे गत तीन ते चार वर्षांंंंपासून या यात्रेत जगदंबा माता मंदिर परिसरात बोकडबळी प्रथा बहुतांश संपुष्टात आली आहे. ज्या देवीच्या मंदिरासमोर रक्ताचे पाट वाहत असत तिथे आता लक्षचंडी यज्ञ होमहवनाचे आयोजन केले जात असल्याचे आशादायक चित्र दिसून येत आहे.
पोहरादेवी येथे भक्तांची मांदियाळी!
By admin | Published: April 03, 2017 2:17 AM