गणेश खवसे, नागपूरएका अपघातात अपंगत्व आल्यानंतरही त्यातून स्वत:ला सावरत जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर एका युवकाने एव्हरेस्ट शिखर सर करण्याची लढाई लढण्यास सुरुवात केली. एव्हरेस्टचे ८५०० मीटरपर्यंतचे अंतर पार केले, मात्र अवघे ३४८ मीटर अंतर बाकी असतानाच एका छोट्या अपघाताने पायाला इजा झाली. त्यामुळे ‘मिशन एव्हरेस्ट’ तेथेच सोडून परतीच्या प्रवासाला निघावे लागले. असे असले तरी त्याने एव्हरेस्ट सर करणाऱ्या आशियातील पहिल्या तरुणाचा ५७३२ मीटरचा विक्रम मागे टाकत स्वत:च्या नावावर एक विक्रम नोंदविला.अशोक रामलाल मुन्ने (३२) असे या ध्येयवेड्या आणि चिकाटी असलेल्या तरुणाचे नाव असून तो मूळचा मूर्ती (ता. काटोल, जि. नागपूर) येथील रहिवासी आहे. अशोक हा तसा जन्मत: सर्वसामान्यच. मात्र ३ फेब्रुवारी २००७ मध्ये रेल्वेने प्रवास करीत असताना तो खाली पडला आणि त्यात त्याचा पाय कापावा लागला. साधारणपणे दोन वर्षांनी म्हणजे २००९ मध्ये कृष्णा पाटीलने एव्हरेस्ट शिखर सर केले. ही बातमी त्याच्या कानावर पडताच त्यानेही ‘एव्हरेस्ट’ सर करण्याचा ‘इरादा पक्का’ केला. अपंग असल्याने बऱ्याच अडचणी येणार याची कल्पना असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी त्याने मार्शल आर्ट कराटे ट्रेनिंग करून ब्लॅक बेल्ट प्राप्त केला. सायकल चालविणे, सुरुवातीला दोन नंतर सहा किमीपर्यंत दौड, मोटारसायकल चालविणे, कार, ट्रॅक्टर चालविणे अशी सर्वसामान्यांशी निगडित दिनचर्या त्याने सुरू ठेवली. एका वीटभट्टीवर जाऊन तेथील मालकाशी मैत्री वाढवून या व्यवसायाचे ज्ञान प्राप्त केले. यानंतर अशोकनेही स्वत:ची वीटभट्टी सुरू केली. इथवरच तो थांबला नाही, तर शेतात राबून भाजीपाल्याचे उत्पादन घेतले. याच काळात त्याने इच्छेची पूर्तता करण्यासाठी मूर्ती या गावाजवळच्या आनंदगड (चिखलागड) या टेकडीवर चढणे सुरू केले. त्यात त्याला यशही आले. गावाजवळच्या मोठ्या टेकडीवर चढल्यामुळे अशोकचा आत्मविश्वास वाढला. यामुळेच त्याने सातपुडा पर्वतातील सर्वात कठीण चढाई असलेला निशाणगड चढण्याचा मनोदय ठरविला. त्याने आॅगस्ट २०१० आणि आॅगस्ट २०११मध्ये तो पर्वत पार केला. १५ नोव्हेंबरला २०११ रोजी महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई (१६४६ मीटर) सर केले.पुन्हा एकदा आडकाठी!जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या एव्हरेस्टवर चढण्याचा बेत अशोकने २०१२ मध्येच केला होता. ‘१२-१२-१२’ असा योग साधून त्याने ‘मिशन एव्हरेस्ट’ सर करण्याचे ठरविले होते. मात्र त्यावेळी त्याचे प्रशिक्षण पूर्ण झालेले नव्हते. त्यामुळे तो योग जुळून आला नाही. यावर्षी त्याने एव्हरेस्ट सर करण्याचे नियोजन केले. त्यानुसार त्याने शिखर पादाक्रांत करण्यास सुरुवातही केली. मात्र ८५०० मीटरपर्यंत गेल्यानंतर त्याच्या पायाला इजा झाली आणि केवळ ३४८ मीटर अंतर राहिले असताना तेथून परतीचा मार्ग धरावा लागला. आता पुढल्या वर्षी ‘मोहीम फत्ते’ करू, असा विश्वास अशोकने ‘लोकमत’कडे व्यक्त केला.आर्थिक मदतीसाठी ‘लोकमत’चा पुढाकारएव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी किमान ३२ लाखांचा खर्च अपेक्षित होता. यासाठी त्याने अनेकांची दारे ठोठावली. बऱ्याच ठिकाणी त्याचा अपेक्षाभंग झाला. याचदरम्यान त्याचा हा संघर्ष ‘लोकमत’ने जगासमोर आणला आणि पाहता - पाहता त्याला आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला. याबद्दल त्याने ‘लोकमत’चे आभार मानले होते. या मदतीनेच त्याला एव्हरेस्ट सर करण्यासाठी हातभार लागला.
दिव्यांग अशोकची ‘एव्हरेस्ट’वर चढाई
By admin | Published: May 22, 2016 4:11 AM