पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर वाढल्याने दिवाळीचे अभ्यंगस्नान करताना काकडा भरु लागला आहे. गुलाबी थंडी लक्ष्मीच्या पावलांनी आल्याने दिवाळीचा आनंद द्विगुणीत झाला आहे. रविवारी राज्यातील बहुतांश शहरातील किमान तापमानात घट झाली. रात्रीचे तापमानही सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशांनी घटले आहे़ राज्यात रविवारी सर्वात कमी तापमान नाशिक येथे ११ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले़ यंदा पावसाळा लांबल्याने ‘आॅक्टोबर हिट’चा त्रास फारसा झाला नाही़ त्यात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्याने उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमध्ये अडथळा आल्याने काही दिवस राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते़ पण, दिवाळीच्या पहिल्याच दिवस किमान तापमानात सरासरीपेक्षा ४ ते ५ अंश सेल्सिअसने घट झाली़ पहिल्या आंघोळीपासूनचे हे चित्र पुढील दोन दिवसही कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकणात अनेक ठिकाणी किमान तापमानात सरासरीपेक्षा घट झाली असून दक्षिण मध्य महाराष्ट्रात तापमान सरासरीइतके आहे़ विदर्भात तापमान सरासरीइतके होते़ मुंबईकरांनीही पहाटे-पहाटे सुखद गारवा अनुभवायला मिळत आहे.राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) मुंबई १८़२, अलिबाग १९, डहाणु २०, पणजी २२, रत्नागिरी १९, जळगाव १४, कोल्हापूर १७, महाबळेश्वर १५, मालेगाव १४, नाशिक ११, पुणे १२, सांगली १६, सातारा १४, सोलापूर १८, औरंगाबाद १५, नांदेड १७, उस्मानाबाद १३, परभणी १७, अकोला १७़४, अमरावती २३, बुलढाणा १७़४, ब्रम्हपुरी २०़६, २१़२, नागपूर १५़५, वाशिम २१, वर्धा १८, यवतमाळ १५़ (प्रतिनिधी)
दिवाळीत पहाट गारवा!
By admin | Published: October 31, 2016 5:11 AM