मोहन राऊत,
अमरावती- गोहळा-गोहळीचे नृत्य करीत सोमवारी दिवाळीच्या पाडव्याला विदर्भातील पाच हजार गावांत ढालपूजन उत्सव साजरा करण्यात आला़ डफडीचा ताल व दादऱ्याच्या निनादात युवकांनी आदिवासी परंपरेत नृत्य सादर केले़ चकाचका चांदणी वो गोवारीयो बिनो़, गायनेसे कोटा भरे, घरघर देबो आशीष गा़़़, अशा दादऱ्याच्या तालावर आदिवासी गोवारी युवकांनी ढालपूजन उत्सवाला सुरूवात केली़ तत्पूर्वी सकाळी गावातील जनावरांना लक्ष्मीसारखे सजविण्यात आले़त्यानंतर सायंकाळी सर्व गाई गुरांना गावातून फिरवून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. दिवाळीच्या दोन दिवसांपूर्वी दोन बाशांवर फडके बांधून पुरूष ढाल म्हणजे गोहळा तर स्त्री ढाल म्हणजे गोहळी उभारण्यात आली.दुपारी प्रथम सुताराच्या घरी पाणी पिण्याकरीता ढाल नेण्यात आली. त्यानंतर नृत्याला प्रारंभ झाला़ डफळी व मुरलीच्या निनादात दादऱ्याची मैफल रंगल्याने नृत्यात अधिकच रंगत आली़ पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यात हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला़ धामणगाव तालुक्यातील विटाळा, कावली, कामनापूर घुसळी यांसह आठ गावांत हा उत्सव साजरा करण्यात आला़>भंडारा, गडचिरोलीत पाच दिवस उत्सव दिवाळीच्या पर्वावर भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात पुढचे पाच दिवस हा उत्सव साजरा करण्यात येत आहे़ आदिवासींची परंपरा जोपासून ठेवण्यासाठी गोवारी युवकांनी या जिल्ह्यात पुढाकार घेतला आहे़