शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
5
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
6
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
7
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
10
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
11
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
12
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
13
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
14
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
15
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
16
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
17
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
18
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
19
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
20
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?

चंद्रदर्शन आणि दगड मारण्याची चतुर्थी...गणेशोत्सवाच्या मुंबईतील इतिहासाची काही पाने..

By अोंकार करंबेळकर | Published: August 28, 2017 2:16 PM

गणपतीच्या सणात दगड मारण्याची प्रथा? मुंबईत एकेकाळी या प्रथेने लोकांना मोठा उपद्रव होत असे...

ठळक मुद्देगणपती उत्सव हा मुंबईकरांसाठी तेव्हाही आजच्या इतक्याच उत्साहाचा सण असे.आरत्या,मेळे, सोंगं यातून करमणुकीचे कार्यक्रम तेव्हा केले जात असत.शंभर-दीडशे वर्षांपुर्वी गणपतीच्या काळात बाणकोटच्या बाल्यांचे नाच विशेष आवडीने पाहिले जात.

मुंबई, दि.28- हिंदू, मुस्लीम, पोर्तुगीज, इंग्रज, बेने इस्रायली अशा सगळ्या जाती धर्मांचे एकत्र नांदण्याचे शहर म्हणजे मुंबई अशी या शहराची गेली अनेक शतके ख्याती आहे. प्रत्येकाने आपापल्या धर्माची उपासना करावी आणि धर्माचे पालन करावे, सण-उत्सव साजरे करावेत अशी या शहराची रितच आहे. शहरामध्ये पुर्वीपासूनच हिंदूंची संख्या इतरांपेक्षा जास्त असल्यामुळे साहजिकच त्यांच्या देवळांची व सण समारंभ वाजतगाजत साजरे करण्याची परंपरा आहे. त्यातही गणपती उत्सव तेव्हाही आवडीचा असल्याचे जुन्या पुस्तकांमध्ये दिसून येते. सार्वजनिक गणेशोत्सव 1893 साली सुरु होण्यापुर्वीही मुंबईत घरगुती गणपतीला मुंबईकरांच्या मनामध्ये विशेष स्थान असल्याचे दिसून येते.

1889 साली मुंबईचा वृत्तांत नावाने बाळकृष्ण बापू आचार्य आणि मोरो विनायक शिंगणे यांनी मुंबईच्या एकूण वर्णन आणि रितीभातींवर उत्तम ग्रंथ लिहिला आहे. त्यामध्ये गणपतीचे वर्णन करताना ते दोघे लिहितात, '' गणपतीच्या सणांत श्रीमंतलोक आपापल्या घरी उत्तम उत्तम  गणपती मांडून रोशणाई करतात. मुंबईत गणपतीचे काम फार नामी करतात, भजने, आरत्या हरिकिर्तनें, वेश्यांची गाणी ह्यांची तर घरोघरी गर्दी उडून जाते. आरत्या चालतात त्या वेळी आणि मंत्रपुष्पांजलीचे वेळी जो दीर्घस्वर होतो व जी ओरड होते ती जर सर्व मुंबईतील एकसमयावच्छेदेकरुन होईल तर, ती ओरड व नाद ब्रह्मांडी सुद्धां ऐकू जाईल असे ह्मटल्यास वावगे होणार नाही! असा आरत्यांचा थाट एकसारखा 10-12 दिवस चालतो. ह्याच सणांत गौरीचा सण येतो. त्या वेळी बाणकोटी लोकांची नाचण्याची, गाणी ह्मणण्याची आणि पोरांस बायकांची सोंगे देऊन त्यांच्या सभोवती मिळून आपापल्या धन्याकडे पोस्ता करता जाऊन नाचण्याची बरीच गंमत पाहण्यात येते."

 शिंगणे आणि आचार्य यांनी गणपती विसर्जनाच्या दिवशी होणाऱ्या मिरवणुकांचे वर्णनही या पुस्तकात केले आहे. आज हे वर्णन वाचले की शंभर-दिडशे वर्षांपुर्वीचा मुंबईचा थाट डोळ्यासमोर येतो. ते लिहितात, ''गणपती जातेवेळी श्रीमंत लोकाची तासे, चौघडे, बेंडबाजे वगैरे वाद्यें लावून समुद्राकडे जाण्याची एकच गर्दी उडते. गणपती बसल्यापासून कोणाचे दुसरे दिवशी, कोणाचे पाचवे दिवशी, कोणाचे 7वे दिवशी व कोणाचे दहावे दिवशी जातात. कित्येकांचे तर महिना महिना सुद्धा राहतात. मुंबईत गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवसापासून गणपती करणारांचे दुकानी बरीच गर्दी दृष्टीस पडते. त्यात गुलालवाडीसारख्या गणपती विकण्याच्या प्रसिद्ध ठिकाणी तर इकडून तिकडे फरकण्यास वाव नसतो. गणपती आणतांना कोणी डोईवर, कोणी हातांत कोणी पालखींत बसवून आणितात. तासें, बेंडबाजे वगैरे वाद्यांचा कडकडाट तर सर्व शहरभर दुमदुमून टाकतो. मुंबईत बहुदा गणपती जातात त्या दिवशी एका आळीतील किंवा वाडीतील दहापाच जणांचे गणपती एकावेळी मिळून काढितात. त्या वेळी तो बेंडबाजाचा, ताशांचा व चौघड्यांचा कडकडाट, ते सुशोभित गणपती, ते गाडी घोडे, ते मल्ल, ते लेजीमवाले, त्या पालख्या व त्या प्रेक्षकजनांच्या झुंडीच्या झुंडी वगैरे थाट पाहून मुंबईतील लोकांच्या डामडौलाची धन्यता वाचल्यावाचून राहणे नाही. एकंदरीत असा थाट इतरत्र क्वचितच होत असेल.'' या वर्णनावरुन सार्वजनिक गणेशोत्सव सुरु होण्यापुर्वीही मुंबईत घरगुती गणपतींनी सर्वांना एकत्र आणल्याचे दिसून येते, गणपती एकत्रित विसर्जनाला नेणे, आरत्या, मेळे यातून लोक एकत्र येत असत. कदाचित याचेच निरीक्षण करुन लोकमान्यांनी सामाजीक, राजकीय प्रबोधनासाठी त्याला सार्वजनिक स्वरुप देण्याचा विचार केला असावा.

गणपतीच्या दहा दिवसांचे वर्णन शिंगणे आणि आचार्य यांनी असे केले आहे तर 1863 साली 'मुंबईचे वर्णन' लिहिणाऱ्या गोविंद नारायण माडगांवकर यांनीही या थाटाचे, मिरवणुकांचे, मुंबईकरांच्या उत्साहाबद्दल लिहून ठेवले आहे. ते लिहितात, ''गणपतीचा उत्साह ह्या शहरांत दहा दिवसपर्यंत एक सारखा मोठ्या कडाक्याने चालतो. कित्येक गृहस्थ वर्ष सहा महिने खपून गणपति स्वतः तयार करितात. हा मातीचा असतो खरा, पण ह्यांत कुशळतेचे काम असून शें दोनशे रुपये यास खर्च करितात. कोठें कोठें उत्कृष्ट चित्रे होतात. जागोजागी शेंकडो गणपति तयार होतात. कित्येक सुंदर मखरे करितात. ह्या दिवसांत समाराधना, कथा, नाच, बैठका, फुगड्या, जलसे इत्यादि होत असतात. पैसेवाले लोक याप्रसंगी हजार पांचशें रुपये खर्च करितात. कोणी कोणी दहा दिवस एक सारखा दारापाशी चौघडा वाजवित असतात, व आरास करितात. हांड्या, झुंबर, गलासें, आरसे व चित्रे जिकडून तिकडून, जमा करुन घरे शृंगारितात व चुना काढून स्वच्छ करितात. ज्या दिवशी गणपती शेळवितात, त्या दिवशी संध्याकाळी रस्त्यांत जिकडेतिकडे तमासा पाहणाऱ्या लोकांची, गाड्यांची व गणपतीच्या पालख्यांची गर्दी होऊन जात्ये. आणि ज्या दिवशी गौरी जातात, त्या दिवशी बाणकोटी लोक रस्तोरस्ती नाचत असतात व त्यांच्या मेळ्यांनी सगळे कांपाचे मैदान भरुन जाते. हे हुमऱ्या घालून एक सारिख्या उड्या मारित असतात.''

मुंबईचा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव, केशवजी नाईक चाळीच्या गणपतीची 125 वर्षेढगळा चोथगणपतीच्या दिवसांमध्ये चंद्राकडे पाहू नये असे म्हटले जाते. पण एखादी गोष्ट करु नका म्हटलं की नेमक्या याच दिवसांमध्ये चंद्राकडे लोकांचे लक्ष जाते. अशा वेळेस कौलारु घरावर दगड मारुन प्रायश्चित्त घेण्याची प्रथा आहे. मात्र या प्रथेचा उपयोग गुंड लोकांनी वेगळ्याच पद्धतीने करण्यास सुरुवात केली. प्रथेच्या आड काही लोकांनी इतरांना उपद्रव द्यायला सुरुवात केल्यानंतर अखेर पोलिसांना आपले बळ वापरुन ते बंद करावे लागले. माडगांवरकरांनी या प्रथेबद्दल त्यांच्या मुंबईचे वर्णनमध्ये लिहिले आहे,'' सुमारे वीस वर्षांमागे गणेश चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी कांपाच्या मैदानच्या रस्त्यांत फिरण्यास बंदी होती. ह्या दिवशी दिव्यांत वात पडली की, द्वाड लोक घरांवर व रस्त्यात जाणाऱ्या येणाऱ्यांवर दगड मारीत. परंतु हे खूळ हल्ली सरकारने अशा लोकांस दंड करुन एकसारखी पांच सहा वर्षे थाळी पिटून बंद केले आहे. हे चतुर्थीच्या चंद्रदर्शनाचा आळ दूर करण्याच्या निमित्ताने होत असे. लुच्चे लबाड लोक मौजेसाठीच लोकांवर दगड मारुन नासाडी करीत, म्हणून या चतुर्थीस एथचे वाणी, पारशी व गुजराथी लोक ढगळा चोथ (दगड मारण्याची चतुर्थी) असे म्हणत. पूर्वी ह्या दिवशीं लोक संध्याकाळचे पांच वाजले म्हणजे दरवाजे बंद करुन राहत.''दगड मारण्याच्या या प्रथेला आलेले असे विचित्र रुप 'मुंबईच्या वृत्तांता'मध्येही करण्यात आले आहे. त्यामध्ये शिंगणे आणि आचार्य यांनी ढगळा चोथबद्दल लिहून ठेवले आहे. '' गणेशचतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन वर्ज्य आहे हे सुप्रसिद्ध आहे, ह्या गोष्टीचा फायदा घेऊन चंद्रदर्शनाचा आळ आपणांवरुन दूर व्हावा ह्मणून कित्येक बदमाष लोक काहीं वर्षांपुर्वी लोकांच्या घरावर दगड मारीत व रस्त्याने जाणारा-येणारांस लुटीत. म्हणून पारशी वगैरे लोक ह्या सणास थट्टेने ढगळाचोथ ह्मणत. हे बंड सरकारने बंदोबस्त करुन मुळींच बंद करुन टाकले." 

 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव