नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे दीक्षाभूमीवर 58 वा धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळा शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे. थायलंडचे मेजर जनरल थानसक पोमपेच्च व ज्येष्ठ पत्रकार डॉ. रंगथिप चोटनापलाई थायलंड सरकारचे प्रतिनिधी म्हणून मुख्य अतिथी राहतील. थायलंडमधील 38 बौद्ध विचारवंतही सहभागी होतील.
केरळचे माजी राज्यपाल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष रा. सू. गवई अध्यक्षस्थानी असतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा सोहळ्याप्रसंगी सकाळी 9 वाजता सामूहिक बुद्धवंदना घेतली होती. तेव्हापासून दीक्षाभूमीवर दरवर्षी सकाळी सामूहिक बुद्धवंदना घेतली जाते. सर्व बुद्धविहारांनी एकाच वेळी बुद्धवंदना घ्यावी, अशी विनंती स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलङोले यांनी केली आहे. (प्रतिनिधी)