ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - धनगर आरक्षण आणि धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीविरोधात राष्ट्रीय धनगर समाज आरक्षण समितीने पुकारलेल्या आंदोलनाला तूर्तास स्थगिती दिली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने यासंदर्भात गृहमंत्रालयाला चौकशीचे आदेश दिल्याने आंदोलन मागे घेत असल्याचे समितीचे प्रमुख हेमंत पाटील यांनी सांगितले.पाटील म्हणाले की, धनगर आरक्षणासाठी मंत्रालयावर ३१ आॅगस्ट रोजी धडक मोर्चा काढण्याचा इशारा समितीने दिला होता. मात्र यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने ३१ आॅगस्टचे आंदोलन तूर्तास स्थगित केले आहे. आंदोलन केल्यास उच्च न्यायालयाचा अवमान ठरण्याची शक्यता आहे. याशिवाय समितीच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीची दखल मुख्यमंत्रीकार्यालयाने घेतली आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने गृहमंत्रालयाला पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे आरक्षणासंदर्भात न्यायालय आणि मारहाण प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. परिणामी, मागण्या पूर्ण झाल्या नाही, तर निश्चित आंदोलन केले जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.