- मोसीन शेख
मुंबई - बीड जिल्हा महाराष्ट्राच्या राजकरणाचा नेहमीच केंद्रबिंदू ठरला आहे. एकेकाळी बीड जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र आज त्याच बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीला उतरती कळा लागली आहे. सुरेश धस, जयदत्त क्षीरसागर आणि आता नमिता मुंदडा या महत्वाच्या नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. मात्र या सर्वच नेत्यांनी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेच्या यांच्या स्थानिक राजकरणाला कंटाळून पक्ष सोडला असल्याचे आरोप केली आहेत. त्यामुळे धनजंय मुंडेंच्या पक्षातील राजकरणामुळेचं बीडमध्ये राष्ट्रवादीची 'घडी' विस्कटली असल्याची चर्चा पहायला मिळत आहे.
काका-पुतण्याचे राजकरण असो की त्यांनतर आता मुंडे बहीण-भावाचा वाद असो. या राजकीय घडामोडींनी बीड जिल्हा नेहमीच चर्चेत असल्याचे पाहायला मिळाले. मात्र आता हाच बीड जिल्हा चर्चेत आला आहे तो, राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीमुळे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंना साथ दिली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांनी शिवबंधन हातात बांधले. तर आता खुद्द राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी उमेदवारी जाहीर केलेल्या नमिता मुंदडा यांनी भाजपची वाट धरली आहे.
बीड जिल्ह्यातील जेवढी महत्वाची नेते राष्ट्रवादी सोडत आहे, त्यांनी पक्ष सोडण्याचे कारण देतांना धनंजय मुंडेंवर खापर फोडले आहे. मागच्या दाराने आलेल्या लोकांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादी आपल्या ताब्यात घेतली असल्याचा आरोप त्यांनी धनंजय मुंडेंवर केला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या गळतीला धनंजय मुंडे हे कारणीभूत असल्याची चर्चा आहे.
मागच्या दरातून आलेले, घर फोडणारे, गुंडगिरी करणारे यांना धडा शिकवा, असं म्हणत लोकसभा निवडणुकीपूर्वी जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी सोडली होती. तर राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार यांच्यापेक्षा स्व:ताला मोठे समजणारे नेते बीड जिल्ह्यात झाले आहेत. माझ्याबद्दल पक्षश्रेष्ठींना खोटी माहिती पुरवल्याचा आरोप करत सुरेश धस यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडला.
त्यांनतर आता शरद पवार यांनी केज मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलेल्या नमिता मुंदडा यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर जिल्ह्यातल्या नेत्यांनी मला पवार साहेबांचा हात सोडायला भाग पाडलं, विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे आणि जिल्हा अध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी गेल्या पाच वर्षांत त्रास दिला, असे अक्षय मुंदडा (नमिता मुंदडांचे पती) यांनी आरोप केला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीची 'घडी' धनंजय मुंडेंमुळे विस्कटली असल्याची चर्चा आहे.