मुंबई - राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आज विधान परिषदेत विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांना पूर्वमशागतीच्या कामासाठी हेक्टरी 25 हजार रुपयांची तातडीने मदत द्या अशी मागणी केली. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुंडे यांनी आज राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला.
सरकारने ३१ ऑक्टोबरला १२१ तालुके दुष्काळी म्हणून घोषित केले असताना, जनावरांसाठी चारा छावण्या उघडण्यासाठी एप्रिल महिना का उजाडला? राज्यभरातील १६०० छावण्यांना अवघे २०० कोटी देऊन सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. जनावरांना टॅगिंगसारखे जाचक नियम लादून शेतकऱ्यांना त्रास दिला जातोय. असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.
अर्ध्यापेक्षा अधिक महाराष्ट्र १९७२ पेक्षा भीषण दुष्काळाला सामोरा जात असताना पाणीपुरवठा, जनावरांसाठी चारा, हाताला काम, विशेष आरोग्य सेवा आणि इतर घोषित दुष्काळी उपाययोजनाचा पुरता बोजवारा उडाला आहे. जाहीर केलेली आर्थिक मदत, बियाणे आणि मान्सूनपूर्व मशागतीच्या अनुदानासाठी रोख मदत मिळालेली नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला असल्याचे मुंडे म्हणाले.
शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या कर्ज माफी पासून लाखो शेतकरी वंचित आहेत. उलट बँका नियमित साडेतेरा टक्के व्याज तसेच दंडनीय व्याजाची आकारणी करीत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून रब्बी हंगामाच्या पूर्वतयारीला सुरवात झाली असताना आणि शेतकऱ्याला पीक कर्जाची नितांत आवश्यकता असताना बँकांनी एनपीएचा बागुलबुवा उभा करून पिककर्जाला नकार देत असल्याचा आरोप मुंडे यांनी केला.