मुंबई - बीड जिल्हा परिषदेच्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या कामातील अनियमततेवरून धनंजय मुंडे यांनी सरकारवर प्रहार करत, सरकारला चांगलेच धारेवर धरले.
जलजीवन मिशनचे घरोघरी स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन जिल्ह्यात सुमारे 1265 कामे सुरू करण्यात आली आहे. यामध्ये झालेल्या भ्रष्टाचारावरून उपस्थित लक्षवेधी मध्ये ज्या कामांची तक्रार करण्यात आली आहे, त्यांचे टेंडर किती टक्के अबोव्हने देण्यात आले, असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.
जिल्ह्यात सध्या सुमारे 1265 कामे सुरू आहेत, एवढी कामे सुरू असताना पाणी पुरवठा विभागास 65 कर्मचारी अपेक्षित असताना केवळ 15 लोक कार्यरत आहेत, त्यामुळे ही रिक्त पदे भरून तातडीने भरण्यात यावीत, जेणेकरून नियमानुसार सुरू असलेली कामे प्रभावित होणार नाहीत, अशी मागणीही यावेळी धनंजय मुंडे यांनी केली.
बहुतांश कामे ठराविक एजंसींना दिल्याचे निदर्शनास आले आहे, त्यामुळे एकाच एजन्सीला जास्त कामे दिल्याने कामांमध्ये बिलंब व अन्य तक्रारी संभवतात, एकूण कामांमधील किती कामे कोणत्या एजंसींना देण्यात आलीत, याची माहिती देणार का? असा सवाल उपस्थित करत मुंडेंनी नेमके वर्मावर बोट ठेवले.
सध्या जलजीवन मिशन मधील कामांमध्ये तक्रारींचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे जिल्ह्यातील सर्व सुरू असलेल्या कामांचे एखाद्या नामांकित थर्ड पार्टी एजन्सीकडून ऑडिट करण्यात यावे, अशी मागणीही यानिमित्ताने धनंजय मुंडे यांनी केली. कामाच्या टेंडरिंग मध्ये राजकीय व्यक्ती व कंत्राटदार यांचा हस्तक्षेप होत असल्याच्या अनेक तक्रारी असून, अशा स्वरूपाच्या अनेक कॉल रेकॉर्डिंग आपल्याकडे पुराव्यांदाखल असल्याचेही धनंजय मुंडे यांनी नमूद केले असता, या प्रकरणी चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल, अशी भूमिका पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जाहीर केली.