मुंबई - प्रशासकीय आणि पोलीस बळाच्या जोरावर दबाव टाकणे आणि फोडाफोडी करण्यातच सरकारचा वेळ जात आहे. फोडा-फोडीचे नवे खाते काढुन गिरीश महाजन यांना त्याचे मंत्री करावे, अशी खोचक टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. विधीमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने अनेक मंत्र्यांना डच्चू देत नवीन चेहऱ्यांना संधी दिली. त्यावर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे म्हणाले की, आज ६ मंत्री यांना वगळले, मात्र भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सर्व दीड डझन मंत्री यांना काढायला हवे होते, असंही मुंडे म्हणाले.
गिरीश महाजन यांची भाजपमध्ये तारणहार म्हणून ओळख आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये घेण्यासाठी महाजन नेहमीच प्रयत्नशील असतात. तोच धागा पकडच धनंजय मुंडे यांनी महाजन यांना टोला लागवला. मुख्यमंत्र्यांनी फोडा-फोडीचे मंत्रालय स्थापन करून त्याचा कारभार महाजन यांच्याकडे द्यावा, असं मुंडे यांनी म्हटले.
यावेळी मुंडे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ आहे. संपूर्ण राज्य दुष्काळाने होरपळत आहे. सत्तेत येण्यापूर्वी फडणवीस यांनी अनेक आश्वसने दिली होती. त्यापैकी एकही आश्वासन पूर्ण केले नाही. १९७२ पेक्षा भीषण दुष्काळ आहे. या सरकारच्या काळात केवळ आभासी विकास झाल्याचे त्यांनी म्हटले.
मुख्यमंत्र्यांनी वातानुकूलीत खोलीत बसून दुष्काळाचा आढावा घेतला. तर सत्तेतील भागीदार असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना परदेश दौरा केल्यानंतर दुष्काळ आठवला. राज्यात दुष्काळ असून शेतकऱ्यांना कर्जाच्या अडचणी येत आहे. सरकारने केलेली कर्जमाफी पूर्णपणे फसली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी मुंडे यांनी केली.