मुंबई - परळीच्या राजकारणात मागील 35 वर्षांपासून मुंडे आणि दौंड कुटुंबातील राजकीय शत्रुत्व सर्वश्रुत आहे. मात्र धनंजय मुंडे यांच्या परळी विधानसभेतील विजयानंतर हे शत्रुत्व संपुष्टात आले आहे. दौड कुटुंबाला राष्ट्रवादीकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळाली असून राजकीय शत्रुत्वानंतर मैत्रीचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे.
संजय दौंड यांचे वडील पंडितराव दौंड यांनी 1985 मध्ये दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा पराभव केला होता. ते काही दिवस राज्यमंत्रीही होते. मात्र त्यानंतर ते पुन्हा कधीही निवडून आले नाहीत. 1990, 1999 साली विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. धनंजय मुंडे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत संजय दौंड यांचा दोनवेळा पराभव केला होता. तर एका पोटनिवडणुकीत संजय दौंड यांनी धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे यांचा पराभव केला होता.
दरम्यान संजय दौंड यांना उमेदवारी मिळावी म्हणून धनंजय मुंडे यांनी प्रयत्न केले आहे. याच दौड पिता-पुत्रांनी धनंजय मुंडे यांच्या विजयासाठी मेहनत घेतली होती. दौंड यांनी आज धनंजय मुंडे यांच्या रिक्त झालेल्या जागेवर उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे दौड-मुंडे कुटुंबातील मैत्री अजुनच घट्ट होणार आहे.