मुंबई : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारताच मेट्रोच्या आरेमधील कारशेडला स्थगिती दिली होती. यानंतर आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेतले. तर नाणार प्रकल्पाला विरोध कऱणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास देखील मुख्यमंत्री ठाकरे सकारात्मक आहे. त्यामुळे मराठा आदोलकांवरील गुन्ह्यांच काय असा प्रश्न उपस्थित होत होता. आता हे गुन्हेही मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
मुंबईतील आरे कारशेडचा मुद्दा भाजपच्या काळात चांगलाच गाजला होता. येथील झाडांच्या कत्तलीवर शिवसेनेने आक्षेप घेतला होता. तर अनेकांनी आंदोलन केले होते. या आंदोलकांवर सरकारकडून गुन्हे दाखल कऱण्यात आले होते. त्यानंतर शिवसेनेने सत्तेत आल्यास, वृक्षतोड रोखून आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. आश्वासनानुसार शिवसेनेने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले आहे.
दरम्यान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी नाणार आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेण्याची मागणी केली होती. यावर ठाकरेंनी सकारात्मक पाऊल उचलले होते. आता धनंजय मुंडेंनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. याआधी त्यांनी भीमा कोरेगाव दंगल प्रकरणातील आरोपींवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती.