राज्यात सध्या लोकसभेचे आणि विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. एकीकडे शिंदे सरकारविरोधात अपात्रतेच्या याचिकांवर याचिका असताना दुसरीकडे राष्ट्रवादीतही फूट पडल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. यामुळे जवळपास तीन डझनावर आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यांच्यासोबत गेलेल्या अन्य आमदारांवर निर्णय येईपर्यंत राज्यात विधानसभा देखील लागण्याची शक्यता आहे. असे असताना गेल्या अधिवेशनात राष्ट्रवादी, शिवसेना भाजपाच्या आमदारांना मोठ्या प्रमाणावर निधी दिल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.
आता धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात तसा आरोप होत आहे. धनंजय मुंडे जिल्हा सोडून आपल्या मतदारसंघात म्हणजेच परळीलाच जास्त निधी देत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सामाजिक कार्यकर्त्यांनी झाडांना गाजर लटकवून लक्षवेधी आंदोलन केले. गाजर हलवा आंदोलन करीत या आंदोलकांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले आहे.
"धनु भाऊंची तरा न्यारी, जिल्ह्यापेक्षा तालुका भारी" या आशयाच्या घोषणेने परिसरात लक्ष वेधले होते. धनंजय मुंडे यापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री होते. सध्या ते कृषिमंत्री असून पालकमंत्री पदाची अधिकृत घोषणा झाली नसली तरी जिल्ह्याचे निर्णय त्यांच्या संमतीने होतात. या परिस्थितीत इतर तालुक्यांपेक्षा परळी मतदारसंघास झुकते माप दिले जाते. आणि याकडे लक्ष वेधण्याकरिता गाजर हलवा आंदोलन करण्यात आले.
दुष्काळ जाहीर करावा यासह शासन आपल्या दारी कार्यक्रमावरील कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी थांबवली जावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.