Dhananjay Munde ( Marathi News ) : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे हे मागील काही दिवसांपासून वादात सापडले आहेत. बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण आणि पवनचक्की कंपनीला मागण्यात आलेल्या खंडणी प्रकरणातील आरोपींमध्ये धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांचा समावेश आहे. त्यामुळे योग्य चौकशी होण्यासाठी मुंडे यांना मंत्रिमंडळातून दूर करा, अशी मागणी होत आहे. मंत्रिपदावरून वादंग सुरू असताना आज धनंजय मुंडे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. हा विभाग सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित असलेला विभाग आहे. सेवा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व या त्रिसुत्रीचा अवलंब करुन विभागाचे काम अधिक प्रभावीपणे करण्याचे निर्देश मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
शंभर दिवसांचा कार्यक्रम तयार करत असताना विभागाचे डिजिटायजेशन, आधुनिक गोदाम व्यवस्था याचा अंतर्भाव करण्याच्या सूचना देऊन धनंजय मुंडे म्हणाले की, "धान्य खरेदी ते धान्य वितरण या प्रत्येक टप्प्यावर त्याची अद्ययावत माहिती घेणारी यंत्रणा निर्माण करावी, धान्याचे वितरण जलद होण्यासाठी ‘एक गाव एक गोदाम’ ही योजना तातडीने कार्यान्वित करावी, स्मार्ट गोदाम उभारण्यात यावीत, वितरण व्यवस्था सुधारल्यामुळे होणारे नुकसान कमी होऊन ग्राहकांना आणि लाभार्थ्यांना फायदा होईल, लाभार्थ्यांना स्मार्ट शिधा पत्रिका वितरण करण्याची कार्यवाही सुरू करावी, धान्य खरेदी ही विकेंद्रित करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा तसेच जास्तीत जास्त गोदामांची उभारणी करण्यात यावी," अशा सूचना त्यांनी दिल्या.
धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, ग्राहक संरक्षण आणि धान्य वितरण यासाठी डिजिटल डॅश बोर्ड विकसित करावा, ग्राहक संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी, त्यामध्ये शाळा, महाविद्यालय यांना सहभागी करून घ्यावे, लाभार्थ्यांना सुलभ आणि त्वरित तक्रार निवारण होईल, अशा प्रकारची यंत्रणा निर्माण करावी.
दरम्यान, या बैठकीस अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, सहसचिव रामचंद्र धनावडे, उपसचिव राजश्री सारंग, संतोष गायकवाड यांच्यासह, अवर सचिव व अधिकारी उपस्थित होते.