धनंजय मुंडे गोत्यात! मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा यासाठी स्वपक्षातून वाढला दबाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 07:46 IST2025-02-07T07:45:24+5:302025-02-07T07:46:03+5:30

Dhananjay Munde Latest Update: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मीक कराड अटक झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्याबाबतच्या अनेक कथित गोष्टी समोर आल्या. 

Dhananjay Munde in big trouble, pressure has increased from within the NCP to resign from the ministerial post | धनंजय मुंडे गोत्यात! मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा यासाठी स्वपक्षातून वाढला दबाव

धनंजय मुंडे गोत्यात! मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा यासाठी स्वपक्षातून वाढला दबाव

मुंबई : अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांची मालिका सुरू असतानाच गुरुवारी वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने त्यांच्या पहिल्या पत्नी करुणा मुंडे यांना देखभाल खर्चापोटी दरमहिना दोन लाख रुपये देण्याचा आदेश दिल्याने मुंंडेंचा पाय आणखी खोलात गेला आहे. या पार्श्वभूमीवर आता स्वपक्षातूनच धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढल्याचे चित्र दिसत आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मीक कराड अटक झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्याबाबतच्या अनेक कथित गोष्टी समोर आल्या. 

भाजप आमदार सुरेश धस, शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकापाठोपाठ एक प्रकरणे चव्हाट्यावर आणल्याने राज्य सरकारची बदनामी होऊ लागल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. 

त्यातच आता स्वपक्षातून अजित पवार गटातील नेतेमंडळींमधूनच मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, यासाठी दबाव वाढला आहे.

कापूस साठवण बॅगेत भ्रष्टाचार

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही धनंजय मुंडे यांना लक्ष्य करत कृषी खात्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला.

महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे महाव्यवस्थापकीय संचालक तथा उपसचिव वस्त्रोद्योग श्रीकृष्ण पवार आणि तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी संगनमत करून ५७७ रुपयांची कापूस साठवणूक बॅग १२५० रुपयांना खरेदी करून ४१ कोटी ५९ लाख रुपयांचा भ्रष्टाचार केला. याची सखोल चौकशी करून कारवाई करा, अशी मागणी पटोले यांनी केली.  

धमक असेल तर मुंडेंनी कोर्टात जावे

मुंडे हे कृषिमंत्री असताना त्यांच्या विभागात तब्बल २७५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. केंद्र सरकारने २०१६ साली शेतकऱ्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे देण्याचे आदेश काढले होते. 

मात्र, कृषी खात्याने या आदेशाला बगल देत शेतीची उपकरणे आणि खतांची खरेदी करताना सर्व नियम धाब्यावर बसवले, असा आरोप दमानिया यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन याबाबत पुरावे देऊन मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर मुंडे यांना कोर्टात जायचे असेल तर त्यांनी जावे आणि कोर्टाचे ताशेरे ओढवून घ्यावेत, असा टोला दमानिया यांनी गुरुवारी लगावला.

धनंजय मुंडे यांच्याबाबत सरकार कुठलीही कृती करताना दिसत नाही. त्यांना आपल्या मित्राला वाचवायचे आहे, पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला वाचवायचे नाही. सर्वसामान्य लोकांच्या आक्रोशाला उत्तर देण्याची त्यांना गरज वाटत नाही, असे दमानिया म्हणाल्या.

बाहुबली आणि कटप्पा कोण?

बीडमध्ये सध्या शिवगामिनी, बाहुबली आणि कटप्पाची मोठी चर्चा होत आहे. पण, बाहुबली कोण आणि कटप्पा कोण हेच कळत नाही. तिथे गुंडशाही सुरू आहे. वाढदिवसानिमित्त कृष्णा आंधळे, वाल्मीक कराड यांचे फोटो स्टेटसला ठेवले जातात, हे धक्कादायक आहे, असेही दमानिया यांनी सांगितले.

Web Title: Dhananjay Munde in big trouble, pressure has increased from within the NCP to resign from the ministerial post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.