मुंबई – राज्यात मशिदीच्या भोंग्यावरून राजकारण पेटलं असताना राष्ट्रवादी आणि मनसे नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही. मंत्री धनंजय मुंडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना अर्धवटराव उपमा दिल्यानंतर आता मनसेनेही जोरदार पलटवार केला आहे. धनंजय मुंडे म्हणजे राष्ट्रवादीची बॉबी डार्लिंग आहे अशा शब्दात मनसेचे प्रवक्ते योगेश चिल्ले यांनी मुंडे यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे(MNS Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी ३ मे पर्यंत मुदत दिली आहे. जर ३ मे पर्यंत भोंगे उतरले नाहीत मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू असा इशारा त्यांनी दिला आहे. मनसेच्या इशाऱ्यानंतर राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडू शकते. धार्मिक तेढ निर्माण होऊ शकतो असा आरोप सत्ताधारी पक्षाकडून केला जात आहे. त्याचसोबत राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही वैयक्तिक टीका केल्यानंतर मनसेकडून त्याला प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
मनसेचे प्रवक्ते योगेश चिल्ले म्हणाले की, धनंजय मुंडे(Dhananjay Munde) म्हणजे राष्ट्रवादीची बॉबी डार्लिंग आहेत. आयुष्यात इतकं डार्लिंग, डार्लिंग केलंय की, तिच डार्लिंग आता अंगाशी आलीय. छातीच कळ उगाच येते का? असा सवाल करत त्यांनी धनंजय मुंडेंवर प्रहार केला आहे. तर दुसरीकडे मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनीही धनंजय मुंडेंवर निशाणा साधत म्हटलंय की, अजितदादांच्या पहाटेच्या शपथविधीत फोन स्विच ऑफ करून बसले, पवारांनी डोळे वटारल्यानंतर अर्धवट आंघोळ करून साहेब माफ करा म्हणून विनवणी करू लागले. मनासारखं खातं मिळालं नाही असं आजही दबक्या आवाजात बोलत असतात. असे हे मुंगेरीलाल राज ठाकरेंवर टीका करतायेत असं त्यांनी सांगितले.
काय म्हणाले होते धनंजय मुंडे?
राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेच्या जाहीर सभेत धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधत म्हणाले की, पूर्वी रामदास पाध्याय यांचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजपाच्या बोलक्या बाहुल्यांचा खेळ सुरू आहे. अर्धवटरावांचा खेळ सुरू आहे. अर्धवटराव आधी भाजपाविरोधात बोलायचे. सीडी लावायचे. एकदा ईडी घुसली आणि अर्धवटराव गप्प बसले असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला.