Dhananjay Munde ( Marathi News ) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मध्यरात्री भेट घेतली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांच्यात आरोप-प्रत्यारोप रंगले होते. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगेंची भेट घेत चर्चा केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री अडीच वाजताच्या दरम्यान धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यानंतर जवळपास एक तास या दोघांमध्ये चर्चा झाली. मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांच्याकडून ही भेट गुप्त ठेवण्यात आल्याचे समजते. त्यामुळे या दोघांमध्ये एक तास नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबतची माहिती मिळू शकली नाही.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील हे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीसाठी गेले असता त्यांनी शेतकऱ्याच्या बांधावरूनच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी फोन करत शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची विनंती केली होती. तसंच आता मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळी इथं घोंगडी बैठक पार पडत आहे. या बैठकीआधी धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलं आहे.